वरोरा : एकाच शाळेतील तीन जीवलग मित्रांचा पोहण्याच्या नादात खड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने शेगाव शोकसागरात बुडाले आहे. लोकेश गुडु गराटे (९), मंगेश गजानन कोडापे (९) व सौरभ नंदकिशोर लालसरे (१०) हे तिघे हीशेगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेचे विद्यार्थी होते आणि एकमेकांचे मित्र होते. रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शेगाव जवळील चिमूर रस्त्यालगतच्या खड्डयामध्ये हे तिघेजण पोहण्यासाठी गेले. त्यात तिघांचाही मृत्यू झाला. रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सोमवारी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)तिघेही हुशार व नियमित विद्यार्थीमृत लोकेश, मंगेश व सौरभ हे तिघेही हुशार विद्यार्थी होते. शेगाव येथील जि.प. शाळेची विद्यार्थी संख्या २०२ असुन यामध्ये हे तिघेही तल्लख बुद्धीचे विद्यार्थी म्हणून ओळखले जात असत. शाळेत नियमीत उपस्थित राहुन अभ्यासाशिवाय शाळेच्या इतरही उपक्रमात ते हिरहिरीने ते भाग घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेत असत, अशी माहिती मुख्याध्यापक गजानन बोधे, केंद्र प्रमुख प्रमोद कोरडे व गटशिक्षणाधिकारी रामराव चव्हाण यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.दोघे बाहेरगावचेमृतांपैकी सौरभ नंदकिशोर लालसरे हा वर्धा जिल्ह्यातील दगडबन या गावचा रहिवासी असून तो शेगाव येथील त्याचे मामा नरेंद्र दातारकर यांच्याकडे शिक्षणासाठी राहत होता. तर लोकेश गुड्डु गराटे हा चिमूर तालुक्यातील सावरगावचा रहिवासी होता. तो शेगाव येथील चंदू रामचंद्र बरडे या आपल्या आजोबाकडे राहुन इयत्ता ३ रीमध्ये शिक्षण घेत होता. मंगेश होता एकुलता एकमंगेश कोडापे हा कोडापे परिवारातील एकटाच मुलगा होता. सौरभ लालसरे याला एक भाऊ असून त्याचा भाऊ मूक असल्याची माहिती त्याच्या आप्तेष्टांनी दिली. दोघांवर शेगावात तर एकावर सावरगावात अंत्यसंस्कारमंगेश गजानन कोडापे व सौरभव नंदकिशोर लालसरे यांच्यावर १३ जुलै रोजी शेगाव येथे तर लोकेश गुड्डु गराटे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी चिमूर तालुक्यातील सावरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.शाळांमध्ये बैठकी घेणारशाळा सुरू असताना किंवा मधल्या सुटीमध्ये मुले शिक्षकांची नजर चुकवून शाळेच्या बाहेर जातात. त्यातून अशा दुर्दैवी घटना घडतात. शाळा प्रशासनाने खबरदारी म्हणून वारंवार विद्यार्थ्यांची हजेरी घ्यावी. त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवावे. अशा अपघातांवर आळा बसविण्यासाठी शाळांमध्ये बैठकी घेण्यात येतील. सदर खड्डा कुणाच्या शेतात आहे. खड्डा परवानगी घेवून खोदला काय? त्यानंतर त्या भोवताल कुंपन का घालण्यात आले नाही? या संपुर्ण प्रकाराची चौकशी करून यामध्ये दोषी असल्यास कार्यवाही करणार.- प्रवीण डांगे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, वरोरा
तीन चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यूने शेगाव शोकसागरात
By admin | Published: July 14, 2015 1:33 AM