लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सुरक्षा रक्षकांना तत्काळ कामावर घेण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात वेकोलि कार्यालयासमोर सोमवारी धरणे देण्यात आले.कोणतीही पूर्व सूचना न देता जुलै महिन्यात वेकोलि व्यवस्थापनाने वेकोलित कार्यरत खासगी सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले. या विरोधात शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी निवेदन देत वेकोलिला आंदोलनाचा इशारा दिला होता. वेकोलिने तेव्हा कामगारांचा प्रश्न मार्गी काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र वेकोलिने सुरक्षा रक्षकांना कामावर घेतले नाही. त्यामुळे आक्रमक झालेले किशोर जोरगेवार यांनी सोमवारी मुख्य प्रबंधक अधिकाºयांच्या कार्यालयासमोर सुरक्षारक्षकांसह धरणे आंदोलन केले. गेल्या कित्येक वर्षापासून वणी क्षेत्रातील पैनगंगा, कोलगाव, मुंगोली, जी.ओ.सी., नायगाव, निलजई-१, निलजई-२, उकनी या खाणीमध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक या ठिकाणी उपस्थित होते. या धरणे आंदोलनाचे संचालन इरफान शेख यांनी केले. याप्रसंगी उपस्थित सुरक्षा रक्षकांना शिवसेना नेते गणेश शेंडे, अनिल बडवाईक, प्रकाश चंदनखेडे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर किशोर जोरगेवार यांनी बोलताना आता केवळ धरणे आंदोलन करण्यात आले. जर सुरक्षा रक्षकांना वेकोलिने कामावर घेतले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.
वेकोलिविरोधात शिवसेनेचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:21 PM