घुग्घुस : गरिबांना कमी पैशामध्ये जेवण मिळावे यासाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या शिवभोजन केंद्राचा सध्या लाॅकडाऊनच्या काळात लाभ होत आहे. दरम्यान, १५ जूनपर्यंत या केंद्रामधून गरजूंना मोफत भोजन दिले जाणार आहे. जिल्ह्यात २४ केंद्रातून नागरिकांना विविध ठिकाणाहून भोजन वितरित केले जात आहेत. घुग्घुसमध्ये नव्याने केंद्राला मान्यता देण्यात आली असून या केंद्राचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले.
येथील बसस्थानक परिसरात जय गुरुदत्ता भोजनालयामध्ये शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन पुरवठा निरीक्षण अधिकारी भारत तुंबडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रसंचालकांसह इतर नागरिकांची उपस्थिती होती. याप्रसंगी गरजूंना शिवभोजन वितरित करण्यात आले.या केंद्रातून गरजूनी लाभ घ्यावा, असे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
बाॅक्स
१०० थाळीचे होणार वितरण
औद्योगिक शहर असलेल्या घुग्घुसमध्ये हाताला काम मिळेल या आशेने नागरिक येतात. सध्याच्या लाॅकडाऊनच्या काळामध्ये त्यांची वाताहत होऊ नये यासाठी नव्याने केंद्र मंजूर करण्यात आले आहे. जय गुरुदत्त भोजनालय या केंद्रातून दररोज १०० गरजू नागरिकांना मोफत शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येणार आहे.