आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा येथून औरंगजेबच्या तावडीतून सुटल्यानंतर मथुरेवरून रायगडाकडे जाताना चंद्रपुरातील महाकालीचे दर्शन घेतले. इ. स. १६६६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे चंद्रपूर प्रांतातून गेल्याचा पुरावा ९१ व्या कलमी बखरीत नोंदविण्यात आला. या ऐतिहासिक संदर्भाचा नव्याने अभ्यास केल्यास मोठा इतिहास पुढे येईल, असा दावा इतिहास संशोधक आचार्य टी. टी. जुलमे यांनी केला आहे.आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेब भेटीचा संदर्भ देवून आचार्य जुलमे म्हणाले, औरंगजेबचा १२ मे १६६६ ला ५० वा वाढदिवस होता. जयसिंगाच्या आग्रहावरून छत्रपती शिवाजी महाराज ५ मार्च १६६६ ला आगऱ्यास निघाले. सोबत नऊ वर्षांचे कुमार संभाजी आणि विश्वासातील ठराविक माणसे होती. त्यावेळी छत्रपती अवघे ३६ वर्षांचे होते. हे सर्व आग्रा येथे एक दिवसाअगोदर म्हणजे ११ मे १६६६ ला जाऊन पोहोचले. कार्यक्रमात हजर झाले.औरंगजेबाने कुटनिती अवलंबून महाराजांना ज्या वाड्यात ठेवले, त्याभोवती पाच हजार फौजांचा पहारा बसवून कैद केले. सुटकेचे सर्व उपाय थकल्याचे पाहून छत्रपतींनी आजारी असल्याचा बहाणा करून तो बरा व्हावा, यासाठी पेटाऱ्यातून मेवा-मिठाई दानधर्म पाठविण्यास सुरूवात केली. १७ आॅगस्ट १६६६ ला पेढ्याच्या पेटाऱ्यातून शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी किल्ल्याबाहेर निसटले. वेशभूषा पालटून घोड्यावर बसून प्रथम मथुरेला पोहोचले. ही वेळ रात्रीची होती. मथुरेला मोरोपंत पिंगळे यांचे मेहुणे कृष्णाजी त्रिमल हे होते. त्यांच्याजवळ युवराज संभाजींना ठेवून मथुरेवरून थेट दक्षिणेची वाट धरली. आचार्य जुलमे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज इ.स. १६६६ मध्ये चंद्रपूर प्रांतातून गेल्याचा पुरावा ९१ व्या कलमी बखरात नमूद आहे. बखरकार म्हणतात, ‘सर्व यात्रा करून देवगडच्या मार्गे चांदे प्रांतातून गंगा इंदूर प्रांता उतरून बालेघात उतरोन कडेवलीतास आले. त्याउपर त्याच वेशे भीमा उतरोन स्वराज्यात आले. पाचाडी येऊन रायगडच्या दरबाराशिवाय दाखल झाले.’ असा उल्लेख या बखरीत करण्यात आला आला. शिवाजी महाराज मथुरा येथून वेषांतर करून ते प्रयाग, काशी, गया, कटक, चांदा, भागानगर, विजापूर मार्गे रायगडास पोहोचून आपल्या मातोश्रीस भेटले, असा उल्लेख उपलब्ध झाला आहे. यावर सखोल संशोधन झाल्यास चंद्रपूर शहराच्या इतिहासात मोठी भर पडणार आहे, याकडेही आचार्य जुलमे यांनी लक्ष वेधले आहे.बाबाजी बल्लाळशाहा आणि छत्रपती शिवाजी महाराजचंद्रपूरचे गोंडराजे ‘कृष्णशहा’ यांच्या मृत्यूनंतर मुलगा बाबाजी उर्फ मानजी बल्लाळशाहा हा गादीवर आला. गादीवर येताच औरंगजेबास बऱ्हाणपुरास जाऊन चार लाख रुपयांचा नजराणा दिला.बाबाजीची आर्थिक परिस्थिती खालावल्यानंतर औरंगजेबाने शहाजहान बादशाहाकडे खटपट करून इ. स. १६४४ वर्षाची खंडणी बाबाजीला माफ करावी, अशी विनंती केली. बाबाजी हा औरंगजेबाचा मित्र होता. बाबाजीकडून धोका होईल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी गुप्त रुपाने महाकालीचे दर्शन घेऊन दान धर्म केले, असा दावा आचार्य टी. टी. जुलमे यांनी केला आहे.
शिवाजी महाराजांनी घेतले होते महाकालीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:54 PM
छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा येथून औरंगजेबच्या तावडीतून सुटल्यानंतर मथुरेवरून रायगडाकडे जाताना चंद्रपुरातील महाकालीचे दर्शन घेतले.
ठळक मुद्देटी. टी. जुलमे : बखरीतील ऐतिहासिक संदर्भाच्या अभ्यासाची गरज