मंगेश भांडेकर चंद्रपूरवरुणराजाच्या अवकृपेमुळे यावर्षी कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट ओढावले. मान्सून कालावधीत कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्याची भूजल पातळी ०.०६ मीटरने खालावली. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील तब्बल ७६ गावांत पाणीटंचाई निर्माण होणार आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान १ जानेवारीपासून सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावांना पाणी टंचाईमुक्त करण्यात येणार आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत दरवर्षी निरीक्षण विहिरींची पाणी पातळी मोजली जाते. उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर संभाव्य पाणीटंचाई आराखडे तयार करण्याकरिता तसेच संभाव्य टंचाई परिस्थितीचे आकलन करण्याकरिता तालुकानिहाय व पाणलोट क्षेत्रनिहाय निरीक्षण विहिरीतील मान्सुनोत्तर भूजल स्थिर पातळीचा आढावा घेण्यात येतो. या आकलनात राज्यातील तब्बल १९० तालुक्यांची भूजल पातळी तीन मीटरने घटल्याचे समोर आले आहे. तर १८४ तालुक्यात २० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीपातळी घटली आहे. तसेच १८८ तालुुक्यात भूगर्भातील पाणीपातळीत दोन मीटरपेक्षा जास्त घट झाल्याचे निष्पन्न झाले. भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करून पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये उन्हळ्यात पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे संकेत दिले. याची दखल घेत राज्य शासनाने दरवर्षी निर्माण होणारी पाणी टंचाई यावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार भेट अभियान आखले आहे. भूजल पातळीत झालेली घट व उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाई यावर मात करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. २०१९ पर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यातील गावे पाणी टंचाईमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे.