२० जानेवारीला मुलाखती : २४ ला यादीची घोषणाचंद्रपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या व त्या पाठोपाठ चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुका स्वबळावरच लढविण्याचा निर्धार शिवसेनेने शनिवारी जाहीर केला. आमदार तथा जिल्हा संपर्क प्रमुख बाळू धानोकर यांनी पत्रकार परिषद घेवून एका अर्थाने शिवसेनेच्या रणनितीचा बिगूल जिल्ह्यात फुंकला.येत्या २० तारखेला चंद्रपुरातील राजीव गांधी सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून यावेळी निवडणूक लढवू इच्छीणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. ना. संजय राठोड यांच्या नेतृत्वात हा मेळावा होणार असून यावेळी पक्षनिरीक्षक उपस्थित राहणार आहेत. २४ जानेवारीला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याचे आमदार बाळू धानोरकर यांनी सांगितले. हा निर्णय स्वबळावरील असून या संदर्भात पक्षातील वरीष्ठांना कल्पना आहे. मुंबई अथवा ठाणे येथे युती झाल्यास हे प्रमाण राज्यात लागू राहीलच असे नाही, असे पक्षश्रेष्ठींनी यापूर्वीच जाहीर केले आहे. आता पक्षाची ताकद वाढली असून सर्वच ठिकाणी उमेदवार उभे केले जातील, असे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिदेला जिल्हा प्रमुख सतीश भीवगडे, चंद्रपूर विधानसभा संपर्क प्रमुख तथा उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार, शहर प्रमुख सुरेश पचारे प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, राजुरा, चंद्रपूर या तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. स्वबळावर लढावे, अशी शिवसैनिकांची भावना आहे. त्यामुळे सहाही विधानसभेत येत्या निवडणुका स्वबळवर लढविण्याची तयारी आहे. चंद्रपूर मनपाच्या निवडणुकाही पक्ष स्वबळावरच लढणार आहे. सर्व कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी भावना आहे. भाजपासोबत युतीसाठी चर्चा करण्याचा प्रश्नच नाही. -आ. बाळू धानोरकर,चंद्रपूर-वणी लोकसभा संपर्क प्रमुख
स्वबळावर लढण्याचा शिवसेनेचा निर्धार जाहीर
By admin | Published: January 15, 2017 12:44 AM