चंद्रपूर : रामजन्मोत्सवाच्या विलोभनिय सोहळ्याने मंगळवारी चंद्रपूरकरांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडले. रामनामाचा जयघोष करीत सायंकाळी गांधी चौकातून निघालेल्या रॅलीतील विविध देखावे पाहण्यासाठी चंद्रपुरांनी दुतर्फा अलोट गर्दी केली होती. विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शहरात राम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तर सध्या चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीचा ज्वर सुरू असल्याने या उत्सवाला आणखी रंग चढला. यानिमित्त शहरातील विविध चौक भगव्या तोरण, पताकांनी सजले होते. मुख्य मार्गावरील चौका-चौकात डी.जे. लावण्यात आले होते. त्यावर रामनामाचा जप सुरू होता. सायंकाळी ४ वाजतानंतर शहरातील वातावरण अधिक भक्तीमय झाले. रामभक्तांचे लोंढेच्या लोंढे गांधी चौकाकडे शोभायात्रा पाहण्यासाठी जात होते. सायंकाळी ७ वाजता शोभायात्रेला गांधी चौकातून प्रारंभ झाला. यात विविध हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेत विविध देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. बँडपथक आणि डीजेच्या तालावर अवघ्या तरूणाईने ठेका धरला होता. ‘रामजी की निकली सवांरी’ सारखी गाणी डीजेवर वाजविली जात होती. आमदार नाना श्यामकुळे, किशोर जोरगेवार, रामु तिवारी, रघुविर अहीर या प्रमुख लोकप्रतिनिधींसह भाजपा, शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते.दरम्यान सायंकाळच्या सुमारास मिरवणूक मार्गावर पोलीस पथकाची गस्त होती. पथकाने जास्त आवाज करून डीजे वाजवणाऱ्यांना ताकीद देत आवाज कमी करायला लावले. (स्थानिक प्रतिनिधी)विविध ठिकाणी महाप्रसाद वितरितस्थानिक गांधी चौकातून शोभायात्रेला प्रारंभ झाला. गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गावर शिवसेना, आझाद बगिचा मित्र परिवार, मनसे, माहेश्वर संघटना, के. पी. भिसी गृप यासह विविध सामाजिक संघटनांच्यावतीने ठिकठिकाणी खाद्य पदार्थ व महाप्रसाद वाटपाचे स्टॉल लावले होते. कचऱ्याची तत्काळ विल्हेवाटशोभायात्रेच्या मार्गात विविध ठिकाणी महाप्रसाद आणि शितपेयांचे स्टॉल लागले होते. पाऊच आणि कागदी प्लेटामधून पदार्थ खाल्यावर ते रस्त्यावर फेकले जात होते. मात्र विविध समाज मंडळांनी मनपाच्या स्वच्छता मोहिमेला सहकार्य करीत डस्बीनची व्यवस्था केली होती. तर कार्यकर्तेही स्वयंस्फूर्तीने कचरा उचलताना दिसले.
चंद्रपुरात शोभायात्रा : रामनामाच्या जयघोषाने शहर दुमदुमले
By admin | Published: April 05, 2017 12:33 AM