परिमल डोहणे लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होतानाच अल्पवयीन मुलींच्या अपहरणातसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील साडेतीन वर्षात ५४८ अल्पवयीन मुलींचे, तर ९९ अल्पवयीन मुलांचे अपहरण झाले आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात सर्व कुटुंब एकत्र असताना व बाहेर पडण्यास बंदी असतानासुद्धा २१४ मुलींचे अपहरण झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यातील ४२२ जणांचा शोध लावण्यास पोलीस विभागाला यश आले असले तरी, अपहरणाची ही आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे. २१ व्या शतकात नवनव्या संसाधनांचा शोध लागला. त्यामुळे लहान वयातच मुलांच्या हातात ॲन्ड्राॅईड मोबाईल आले. यातील विविध अप्लिकेशनद्वारे देश-विदेशातील मित्र-मैत्रिणीच्या संगतीत अडकले. घरातील संवाद लोप पावला. त्यातच लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल वापरण्याची मोकळीक मिळाली. याकडे पालकांचे दुर्लक्ष झाले. याचाच फायदा घेत अनेकांनी आमिष दाखवून १८ वर्षाखालील सुमारे २१४ मुलींचे व ३१ मुलांचे अपहरण जानेवारी २०२० पासून मे २०२१ या कालावधीत केल्याची नोंद जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत दाखल आहे. मागील साडेतीन वर्षांची आकडेवारी बघितल्यास, जिल्ह्यात ५४८ मुलींचे, तर ९९ मुलांचे अपहरण झाले. त्यापैकी ४२२ मुली व ८७ मुले शोधण्यात पोलिसांना यश आले आहे,
साडेतीन वर्षात ५६० जण बेपत्ता सन २०१८ पासून मे २०२१ पर्यंत जिल्ह्यात १८ वर्षावरील ३८७ महिला, तर १७३ पुरुष असे एकूण ५६० जण बेपत्ता झाले आहेत. यापैकी १२० पुरुषांचा, तर २७२ महिलांचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले आहे. यांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून दरवर्षी एक महिना ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येते. त्याअंतर्गत अनेकांना शोधण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे
स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातून लावला मुलींचा शोधजिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या मुलींचा तपास स्थानिक पातळीवरील पोलीस करतात. चार महिन्यात त्याचा शोध लागला नाही, तर तो स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येते. स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक यासाठी काम करीत असते. आतापर्यंत स्थानिक गुन्हे शाखेने अपहरण झालेल्या मुली या हैदराबाद, राजस्थान, गुजरात आदी परराज्यातून हुडकून काढल्या आहेत. यावरून अपहरणाचे कनेक्शन परराज्यात असल्याची साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
चार महिन्यानंतरही अपहरणातील व्यक्तीचा शोध लागला नसल्यास ते प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे येते. आमचे एक विशेष पथक त्यासाठी काम करते. मागील सन २०१८ पासून ६४७ जणांचे अपहरण झाले आहे. त्यापैकी ५३९ जणांचा शोध लावण्यास यश आले आहे. तसेच मिसींगच्या प्रकरणासाठी एक महिना ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येते. त्याद्वारे ५४८ पैकी ३९० जणांचा शोध लावला आहे. -बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर