कोरपना (चंद्रपूर) : गडचांदूर येथील जनता प्रदूषणामुळे हैराण बनली आहे. वाढत्या आरोग्याच्या समस्यांमुळे गडचांदूर प्रदूषण नियंत्रण कृती समितीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली होती. अखेर या तक्रारीची दखल घेऊन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मोका पंचनामा करून अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, युनिट-माणिकगड सिमेंट वर्क्स, गडचांदूर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून वायू, जल, पाणी असे तिन्ही प्रकारचे प्रदूषण सुरू आहे. कृती समितीने दिलेल्या तक्रारीवरून २५ एप्रिलला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सिमेंट कंपनीला भेट दिली. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना अनेक प्रदूषणविषयक त्रुटी आढळून आल्या. उद्योगात वायू, जल व ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात आढळून आले. नगरपरिषदेच्या इमारतीवर लावण्यात आलेल्या धूळ मोजणी यंत्राला सुद्धा भेट देण्यास प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कृती समितीने भाग पाडले. हे यंत्र अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असून कोणीही अधिकारी या ठिकाणी येऊन तपासणी करीत नाही, तसेच अंदाजे अहवाल देत असल्याचे लक्षात आले.
यावेळी नगरपरिषदेचे गटनेते विक्रम येरणे, सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजेकर, सचिन भोयर, प्रा. आशिष देरकर, सतीश बिडकर, घन:श्याम पाचभाई, शैलेश लोखंडे, वैभव राव आदी कृती समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.
बोर्डाने सिमेंट उद्योगाला चालविण्यास संमती दिली आहे. ठरवून दिलेल्या नियमांचे पूर्णपणे उल्लंघन होत असल्याचे नोटिसीत नमूद आहे. माणिकगड सिमेंट कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिसीमध्ये कायदेशीर कारवाई का सुरू केली जाऊ नये?, उद्योगाचे उत्पादन बंद करण्याचे निर्देश का देऊ नयेत? याबाबत हे पत्र मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी ए. एम. करे यांच्या सहीनिशी देण्यात आले आहे.
कंपनीला ज्या अटींवर परवानगी देण्यात आली, त्यावेळी ठरवून देण्यात आलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. प्रत्यक्ष भेटीदरम्यान कंपनी परिसरात हे अनुभवास आले. शहरातील जनतेला सुद्धा सिमेंट कंपनीच्या धुळीचा नाहक त्रास आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत बनलेले दिसून आले.
- अतुल सातफडे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर.