मूल : नगरपरिषद मूल अंतर्गत येणाऱ्या वार्ड नं.१४ चरखासंघ परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून अनेक झुडुपांनी वाढलेली आहेत. येथे अनेकवेळा अस्वलाचा वावर असल्याचे दिसून आले आहे.
नगरपरिषद सध्या स्वच्छता अभियान राबवत आहे. मात्र शहराला लागून असलेल्या चरखासंघ परिसरात अस्वलाचा वावर असल्याने असणारी झाडे झुडपे धोकादायक असल्याने जागा स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासाठी नगरपरिषदेने लक्ष घालून परिसर स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
स्वच्छता अभियानात अग्रेसर असलेल्या मूल नगरपरिषदेने विविध पुरस्कार मिळविले आहेत. यावर्षीसुद्धा अभियान राबविले जात आहे. चरखासंघ परिसरातील मोठमोठी झाडे वाढलेली असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात अस्वलाचा वावर वाढला असून याच परिसरात अस्वल फिरत असते. चारही बाजूला घरे असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये जा सुरु असते. तसेच याच परिसरात शाळा असल्याने शाळेचे विद्यार्थीसुद्धा ये जा करीत असतात. त्यामुळे या दाट झुडुपाच्या आड अस्वल दडून बसून हल्ला करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाढलेली झुडपे व कचरा साफ करुन चरखासंघ परिसर स्वच्छ करावा, जेणेकरुन दिसायला सुंदर दिसेल व स्वच्छता अभियानाला देखील हातभार लावता येईल. यासाठी नगरपरिषदने त्वरित लक्ष घालून परिसर स्वच्छ करण्याची मागणी नगरवासीयांनी केली आहे.