देवाडा : राजुरा तालुक्यातील पेसा आदिवासी ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय सोंडो अंतर्गत काकळघाट ते देवापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर झुडपे वाढली असून झाडे लोंबकळलेल्या अवस्थेत असल्याने वाहन, बैलबंडी चालवताना शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
देवापूर ते काकळघाट जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला दोन किमी अंतरावर असलेल्या बाभळीचे काटेरी झाडे वाकून लोंबकळत असल्याने वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकी, चारचाकी, बैलबंडी चालकांना दिसून येत नाही. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमित रहदारी करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. जिवती, गडचांदूर व देवाडा-राजुरा- तेलंगणाला जोडणाऱ्या या मार्गे वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. काकळघाट, भुरकुंडा, भेदोडा, रानवेली, मंगी, अंबुजा सिमेंट कंपनी, सुकडपल्ली, देवापूर येथील नागरिक नेहमी देवाडाकडे ये-जा करीत असतात. मात्र तीन किमी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरील झुडपे तोडून रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करणे गरजेचे आहे.