सिंदेवाही : शहरापासून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील वनविभाग श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील इको-पार्क तयार करण्यात येणार आहे. तारेचे कंपाऊंड व भव्य मोठे प्रवेशद्वार तयार करण्यात आले असून, सध्या स्थितीत झाडाझुडपांचा विळखा वाढला आहे. त्यामुळे किमान स्वच्छता तरी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी इको-पार्क मंजूर करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वनविभाग महालक्ष्मी मंदिर परिसरात बारा एकर जागेचा प्रस्ताव करून इको पार्क मंजूर आहे. यासाठी भव्य प्रवेशद्वार बांधले असून, सभोवताली तारेचे कंपाऊंड पूर्ण झाले आहे. मात्र सध्या झाडाझुडपांचा विळखा आहे. विशेष म्हणजे, वाघाचे काही ठिकाणी दर्शन होत असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाघांचा बंदोबस्त करून इको-पार्क अद्यावत करण्याची मागणी केली जात आहे.