सिंदेवाही :
सिंदेवाही विभागात मोठ्या प्रमाणात विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून, ही कामे पूर्ण झाल्यावर लवकरच या भागाचा कायापालट होईल, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
ते आयोजित सभेत बोलत होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, आता ज्या कामांना मंजुरी दिली आहे, ती कामे पुढील दोन ते तीन महिन्यात पूर्ण करण्यात येतील. उन्हाळ्यात नागरिकांना थंड व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पाण्याची १९ एटीएम बसविण्यात येणार असून, यासाठी एक कोटी ६५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रस्ते बांधकामासाठी ३३ कोटी, ई लायब्ररी तहसील इमारतीचे सौंदर्यकरण, पोलीस स्थानक इमारतीचे बांधकाम, पोलिसांची निवासस्थाने, पंचायत समिती इमारत, ग्रामीण रुग्णालयाचे १०० बेड, सर्व शाळेला कुंपण, पर्यटन सफारी, अग्निशमनची गाडी, वन उपजाऊ आधारित प्रकल्प कामे मंजूर करण्यात आली आहेत. सन २०२३मध्ये गोसेखुर्द कालव्याचे काम पूर्ण होऊन सिंदेवाही तालुक्यातील ६५ टक्के जमीन सिंचनाखाली येईल व मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होऊन शेतीसाठी वरदान ठरेल. सिंदेवाही शहर झपाट्याने विकासातून पुढे जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक नगराध्यक्ष आशा गंडाटे यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष स्वप्नील कावडे, नगरसेवक भूपेश लाखे, युनूस शेख, आशा जीवने, लोनवाही सरपंच समर्थ सुनील उत्तरवार, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोधे, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सीमा सहारे, अरुण कोलते उपस्थित होते.