सिंदेवाही : सिंदेवाही नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने तांत्रिक, प्रशासकीय, राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या निवडणुकीवर कोरोना, ओबीसी आरक्षणाची टांगती तलवार आहे. यामुळे निवडणुका अपेक्षित वेळेत होणार की पुढे ढकलणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
२०१५ ते २०१६ मध्ये शहरातील ग्रामपंचायत जाऊन २०१६-२०१७ नगर पंचायत स्थापन करण्यात आली. शहराचे १७ वाॅर्डात विभाजन करण्यात आले. एवढीच नगरसेवक संख्याही होती. राज्यातील नगर पंचायत निवडणुकीचे वारे रचनेच्या कार्यक्रमाला मंत्रिमंडळाने हिरवी झेंडी दिली आहे. पहिल्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. पण अडीच वर्षाने भाजपाचे चार नगरसेवक काँग्रेसमध्ये गेल्याने पुढचे अडीच वर्ष काँग्रेसने सत्ता चालविली. आता आगामी नगर पंचायत निवडणुकीत समीकरणे बदलली आहे. क्षेत्राचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे. नगर पंचायतीच्या हद्दीत कामाचा सपाटा लावला आहे. नगराला राजकीय पक्षांनी सक्षम नेतृत्व देण्याची गरज आहे. अजूनही शहरात विविध समस्या आहेत. नगर पंचायत प्रशासनावर पकड निर्माण करेल, अशा व्यक्तींची मतदारांना गरज आहे. जो पक्ष मतदाराच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल, असा उमेदवार देईल, त्याचा विजय पक्का मानला जात आहे. अनेक इच्छुक उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी नेत्यांसमोर मोर्चेबांधणी करीत आहेत. उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक पुढारी येणाऱ्या महिन्यात विविध पक्षात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, बसपा आदी पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.