सिंदेवाही : ‘ जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा’ या न्यायाने संतानी काम केले. आपणही त्यांचे विचार समाजात रुजवावे, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केले.
येथील मार्कंडेय सभागृहात आयोजित मार्कंडेय ऋषी जयंती महोत्सवात ते बोलत होते. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेचे निमित्त साधून प्रेम व आकर्षण यातील फरक समजून घ्यावा, असा प्रेमाचा सल्ला ही त्यांनी याप्रसंगी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक चिंतलवार होते, तर प्रमुख अतिथी विदर्भ पद्मशाली महिला अध्यक्ष रश्मी परसावार, समाजाचे अध्यक्ष उद्धवराव चिंदमवार, महिला अध्यक्ष कविता कुंटावार, युवा अध्यक्ष राकेश कुंटावार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सचिन नाडमवार उपस्थित होते. यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन तुलसीदास तुम्मे तर आभार कविता कुंटावार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रफुल्ल तुम्मेवार, अनुप श्रीरामवार, राकेश कटकमवार व समाजबांधवांनी परिश्रम केले.