प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : रोजगाराच्या शोधात दोन महिन्यांपूर्वी गोवरी येथे आलेले मजूर राज्यात संचारबंदी असल्याने येथे अडकल्याने त्यांचा सध्यातरी गावाला जाण्याचा मार्ग धूसर झाला आहे. साहेब, आम्हाला आमच्या गावाला पोहचवा ना......असा आर्त टाहो या मजुरांनी प्रशासनाला केला आहे.पोटासाठी माणसाला कुठेही जाऊन काम करावे लागते. दोन वेळेच्या भाकरीसाठी माणसाला धडपड करावी लागते. भगवान भटलाडे, मनिषा भटलाडे, भानुदास जिव्हारे, चौतराबाई जिव्हारे सर्व रा.रुपापूर जि.आदिलाबाद (तेलंगणा) व सुशिलाबाई कांबळे, वैष्णवी कांबळे, मनिषा कांबळे सर्व.रा.पल्लेझरी ता.जिवती जि.चंद्रपूर हे सर्व मजूर कामाच्या शोधात दोन महिन्यापूर्वी राजुरा तालुक्यातील गोवरी येथे आले होते. संचारबंदीमुळे शेतातील कामे अडली असली तरी शेतातील मजुरांची बहुतांश कामे आता आटोपली आहेत. मजूर गावाला जाण्याच्या तयारीत असताना अचानक कोरोना संसर्गाने थैमान घातले असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये धडकताच सारे समिकरण बदलले. महाराष्ट्रात या रोगाचा प्रसार झपाटयाने वाढत असल्याने शासनाने राज्यात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर रोजगारांच्या शोधात आलेले मजूर राजुरा तालुक्यातील गोवरी येथे अडकले आहे.भगवान भटलाडे, मनिषा भटलाडे, भानुदास जिव्हारे, चौतराबाई जिव्हारे हे चार मजूर तेलंगणा राज्यातील रा.रूपापुर जि.आदिलाबाद येथील आहे तर जिवती तालुक्यातील पल्लेझरी येथील सुशिला कांबळे, मनिषा कांबळे, वैष्णवी कांबळे या तीनही मायलेकी रोजगाराच्या शोधात आल्या होत्या. परंतु आता राज्यात संचारबंदी लागू झाल्याने त्यांना आपल्या गावाची वाटच धूसर झाली आहे. घरची मंडळी आपल्या परिवारातील सदस्य घरी यावी म्हणून आतुरतेने वाट बघत आहे. या मजुरकडील आता जीवनावश्यक वस्तू संपल्यात जमा आहे. हे मजूर या ठिकाणी पुन्हा काही दिवस राहिले तर त्यांच्या दोन वेळेच्या पोटाचा प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या हे सर्व मजूर गोवरी येथील भाऊराव रणदिवे यांच्या शेतात आपला संसार थाटून राहत आहे.रणदिवे त्यांचा मुलगा अमित रणदिवे आणि मोरेश्वर रणदिवे यांनी या आलेल्या सर्व मजुरांना सामाजिक बांधिलकी म्हणून राहण्याची सोय करून दिली आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यासह जिल्हा व गावाच्या सीमा नागरिकांनी बंद केल्या आहेत.त्यामुळे या मजुरांचा स्वगावी जाण्याचा बिकट प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा व तालुका प्रशासनाने आम्हाला आमच्या गावाला पोहचवून देण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी आर्त मागणी या मजुरांनी प्रशासनाला केली आहे. साहेब,आम्हाला आमच्या गावी पोहचवा ना.....हा मजुरांचा आर्त टाहो प्रशासनालाही सुन्न करणारा ठरला आहे.
साहेब,आम्हाला आमच्या गावाला पोहचवा ना..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 6:00 AM
पोटासाठी माणसाला कुठेही जाऊन काम करावे लागते. दोन वेळेच्या भाकरीसाठी माणसाला धडपड करावी लागते. भगवान भटलाडे, मनिषा भटलाडे, भानुदास जिव्हारे, चौतराबाई जिव्हारे सर्व रा.रुपापूर जि.आदिलाबाद (तेलंगणा) व सुशिलाबाई कांबळे, वैष्णवी कांबळे, मनिषा कांबळे सर्व.रा.पल्लेझरी ता.जिवती जि.चंद्रपूर हे सर्व मजूर कामाच्या शोधात दोन महिन्यापूर्वी राजुरा तालुक्यातील गोवरी येथे आले होते.
ठळक मुद्देमजुरांचा आर्त टाहो : तेलंगणातील मजूर अडकले गोवरीत