साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्कांचे वितरण केले जाते. मात्र, दरवर्षीच अभ्यासक्रम बदलत नसल्यामुळे जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करता येऊ शकतो. यासाठी शिक्षण विभागाने पालकांनी विनंती केल्यानुसार जिल्ह्यातील तब्बल सहा हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण विभागाकडे मागील वर्षीची पुस्तके परत करीत समजूतदारपणा दाखविला आहे. जिल्ह्यातील अन्य पालकांनीही पर्यावरण संवर्धनासाठी असाच समजूतदारपणा दाखविला तर काही प्रमाणात का, होईना शासनाचा खर्च वाचणार असून पर्यावरण संवर्धनासाठीही हातभार लागणार आहे.
मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १ लाख ६९ हजार विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानांतर्गत पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले होेते. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे प्राथमिक विभागाची वर्षभर शाळा भरलीच नाही. तर ५ ते ८ वीपर्यंतची २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यात आली. मात्र, त्यांचेही वर्ग काही दिवसच भरले. त्यामुळे मागील वर्षी विद्यार्थ्यांना वितरित केलेले पुस्तकांचा पाहिजे तसा वापरच झाला नसल्याने पुस्तके जशीच्या तशीच होती. त्यामुळे शिक्षण विभागाने पालकांना मागील वर्षीची पुस्तके परत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ६ हजार पालकांनी पुस्तके परत करून आपले कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षण विभागाने १ लाख ६३ हजार विद्यार्थ्यांसाठीच पुस्तकांची मागणी शासनाकडे नोंदविली आहे.
बाॅक्स
पुनर्वापर केल्यास कागदाची होणार बचत
पुस्तकांचा पुनर्वापर केल्यास मोठ्या प्रमाणात कागदांची बचत होणार असून या माध्यमातून होणारा खर्चही वाचणार आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लागू शकतो.
बाॅक्स
मागील वर्षीची मागणी
१ लाख ६९ हजार (पुस्तक संच)
या वर्षीची मागणी
१ लाख ६३ हजार( पुस्तक संच)
बाॅक्स
जनजागृतीची गरज
पुस्तकाच्या पुनर्वापरासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. दरवर्षी फुकट पुस्तक मिळत असल्यामुळे काही पालक डोक्याला ताप लावून घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाने पुस्तकाच्या पुनर्वापरासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यास याचा बऱ्यापैकी फायदा होण्यास मदत होईल.
बाॅक्स
विद्यार्थ्यांना लागणार सवय
पुस्तकांच्या पुनर्वापरासाठी जनजागृती केल्यास तसेच विद्यार्थ्यांना त्या प्रकारे समजावून सांगितल्यास दरवर्षी मोठ्या प्रमाणात मोफत दिलेली पुस्तके शिक्षण विभागाकडे गोळा होऊ शकतात. दरम्यान विद्यार्थ्यांना नीटनेटकेपणा तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वही या माध्यमातून कळू शकेल.
कोट
पुस्तकांच्या पुनर्वापराबाबत पालकांना विनंती करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील काही पालकांनी मागील वर्षीचे पुस्तक शाळांमध्ये जमा केले आहे. पर्यावरण संवर्धन आणि खर्च वाचविण्यासाठी पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.
-दीपेंद्र लोखंडे
शिक्षणाधिकारी, प्राथमिक
बाॅकस्
अशी आहे विद्यार्थी संख्या
पहिली- २८८२४
दुसरी- ३१२७२
तिसरी- ३१७८४
चौथी- ३३७१९
पाचवी- ३२८४५
सहावी- ३२३५३
सातवी- ३३१६१
आठवी- ३३४४१