सास्ती : राजुरा तालुक्यातील चिंचोली (बु.) येथील वयोवृद्धाने त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर २०१५ साली पेन्शनसाठी आवश्यक कागदपत्रे क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे सादर केली. त्यानुसार पेन्शनही मंजूर करण्यात आली. पेन्शनचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा करण्यात आला; परंतु त्यानंतर मात्र आजपर्यंतची दरमहा मिळणारी पेन्शन अजूनही खात्यात जमा करण्यात आलेली नसून बँक खाते क्रमांकात चूक असल्याचे सांगत त्यांना सहा वर्षांपासून पायपीट करावी लागत आहे.
राजुरा तालुक्यातील चिंचोली (बु.) येथील वसंता डोमा मडावी हे महाराष्ट्र राज्य वीज मंडळात तंत्रज्ञ पदावर कार्यरत होते. वयोमानानुसार ते ऑक्टोबर २०१२ ला सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे भविष्य निर्वाह निधीचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार त्यांना दोन वर्षांनंतर सप्टेंबर २०१५ ला पेंशन मंजूर झाली. पेंशन कार्यालयाने त्यांच्या पेंशनचे एरियस ५९ हजार ९६४ रुपये त्यांच्या विरूर (स्टे) येथील बँक खात्यात जमा करण्याकरिता पाठविण्यात आले; परंतु बँकेने त्यांच्या पी.पी.ओ. ऑर्डरनुसार त्यांचे खाते क्रमांकात तफावत असल्याचे कारण दाखवित नोव्हेंबर २०१५ ला सदर निधी पेन्शन कार्यालयास परत पाठविला आणि खाते क्रमांकात दुरुस्ती करून निधी वळता करण्याची विनंती केली. त्यानंतर काय दुरुस्ती झाली माहीत नाही; परंतु सदर पेन्शन एरियस रक्कम खात्यात जमा करण्यात आली; परंतु त्यानंतर मात्र दर महिन्याला मिळणारी पेन्शन आज सहा वर्षांचा कालावधी लोटला तरी अजूनही जमा करण्यात आलेली नाही.
वसंता मडावी यांनी अनेकदा नागपूर येथील क्षेत्रीय भविष्य निधी कार्यालयात निवेदने देऊन बँक खाते क्रमांकातील तफावत दूर करून दरमहा पेन्शन जमा करण्याची विनंती केली; परंतु याकडे मात्र अधिकाऱ्यांनी कमालीचे दुर्लक्ष केले. त्यांना त्वरित दरमहा पेन्शन मिळावी, अशी मागणी ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्यावतीने करण्यात येत आहे.
बॉक्स
पेन्शनधारकांच्या अनेक समस्या
ईपीएस ९५ पेन्शनरच्या अनेक समस्या आहेत. पेन्शन कार्यालयात अशी अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यामुळे पेन्शनरवर अन्याय होत आहे. पेन्शनरच्या समस्यांचे प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढून वसंता मडावी यांची पेंशन त्वरित अदा करण्यात यावी, अन्यथा पेन्शनर संघर्ष समितीच्यावतीने आक्रमक पाऊल उचलावे लागेल, असा इशारा ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती चंद्रपूरचे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र मुसळे यांनी दिला आहे.