घुग्घुस : वेकोली वणी क्षेत्राच्या घुग्घुस कामगार वसाहतीमधील सुभाषनगरच्या दुमजली क्वार्टर क्र. ७३-७४ च्या वरच्या जिन्याची सुरक्षा भिंत कोसळली. ती खाली वाहनांसाठी बनविण्यात आलेल्या शेडवर पडली. त्यात वाहनांचे नुकसान झाले. सदर घटना गुरुवारी (दि. ३) सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली. यापूर्वीं त्याच परिसरातील एका क्वार्टरची सुरक्षा भिंत १ एप्रिलला कोसळली होती.
वणी क्षेत्राच्या घुग्घुस परिसरात विविध कामगार वसाहती आहेत. त्या वसाहतींतील क्वार्टरचे २५ वर्षांपूर्वी बांधकाम झाले. कामगार वसाहतीमधील अनेक क्वार्टर जीर्ण झाल्या आहेत. खिडक्या, दरवाजे, शौचालयाचे गटर तुटलेले आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी ठिकठिकाणी तुटलेल्या आहेत. पाणी साचून राहत असते. कामगार वारंवार क्वार्टर दुरुस्तीसाठी व्यवस्थापन, कामगार संघटनेकडे तक्रारी करून साकडे घालतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वी स्लॅब कोसळण्याच्या घटना अनेकदा घडल्या. क्वार्टरच्या आतील वरच्या स्लॅबचे प्लास्टर पडत आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झाला असला तरी क्वार्टर रिपेअरिंगकडे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वी सुभाषनगरमधील पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीच्या वरचा भाग कोसळला होता. अशा घटना घडत असल्या तरी आतापर्यंत जीवितहानी झाली नाही. मात्र स्लॅब, सुरक्षा भिंत, दुमजली क्वार्टरचे जिने कोसळल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने कामगार वर्गात आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.