सावली : तालुका निर्मितीच्या तब्बल २८ वर्षांनंतर सावली येथे बसस्थानक मंजूर झाले. मात्र मागील दीड वर्षापासून सदर बसस्थानकाचे काम संथगतीने चालू आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
परिवहन महामंडळाने सुमारे २ कोटी ६४ कोटी रुपये मंजूर करून सावली येथे सर्व सुविधायुक्त अशा बसस्थानकाच्या इमारत बांधकामाला सुरुवात केली. कोरोना लाॅकडाऊनच्या काळात काही दिवस बंद असलेले काम पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र निधीअभावी बसस्थानकाचे काम संथगतीने सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. सावली शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे दुपदरीकरणाचे काम करण्यात आले. त्यावेळी अनेक झाडे तोडण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच ताटकळत राहावे लागत आहे. बांधकामाचा निधी अजूनही मिळाला नसल्याने बांधकाम संथगतीने होत असल्याचे कंत्राटदाराचे म्हणणे आहे.