ग्रामविकास विभागातर्फे गौरव: सरपंच व सचिवांचा केला सत्कार
बल्लारपूर: यावर्षी ग्रामविकास विभागाने राज्यात ‘स्मार्ट गाव’ योजना राबविली. या योजनेअंतर्गत बल्लारपूर तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत जिल्ह्यात सर्वाधिक गुण नांदगाव (पोडे) ग्रामपंचायतीने प्राप्त केले. त्यामुळे ग्रामविकास विभागाने नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे व ग्रामविकास अधिकारी आर. एम. भानोसे यांचा ‘स्मार्ट गाव’चा पुरस्कार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने चांदा क्लब मैदानावर शनिवारी डिजिटल शाळा साहित्य वितरण सोहळा, स्मार्ट गाव पुरस्कार वितरण समारंभ, हागणदारीमुक्त पंचायत व ग्रामपंचायत गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रामविकास व महिला बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आ. नाना शामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, माजी जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, समाजकल्याण सभापती ब्रीजभूषण पाझारे, पंचायत समिती सभापती गोविंदा पोडे, अर्चना जीवतोडे, संतोष तंगडपल्लीवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांची उपस्थिती होती.बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे, उपसरपंच मल्लेश कोडारी, ग्रामपंचायत सदस्य सुनील शेंडे, संतोष रोहणकर, अनिता हस्ते, वैशाली उपरे, नंदा गोहणे, रेखा मिटपल्लीवार, माजी सरपंच गोविंदा पोडे, ग्रामविकास अधिकारी राजेश भानोसे यांनी गावपातळीवर ग्रामस्वच्छता अभियान उत्कृष्ट राबवून गावातील शाळा डिजिटल करण्यास हातभार लावला. त्यांनी हागणदारीमुक्त गाव अभियान यशस्वी केले. परिणामी गावाची स्मार्ट गाव म्हणून ओळख निर्माण झाली. या योगदानाबद्दल ना. सुधीर मुनगंटीवार व ना. पंकजा मुंडे यांच्या हस्ते र्स्माट गाव पुरस्कार प्रदान करुन सत्कार करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)