बी.यू. बोर्डेवार
राजुरा : सध्या जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. आणि याच वाढत्या संक्रमणाला रोखण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहे. पण कडक निर्बंधाच्या लॉकडाऊनमध्ये रेती चोरट्यांनी तस्करीचे लॉक ‘ओपन’ केले आहे. आता तर जिल्ह्यातील काही रेती तस्करांनी गोंडपिपरीच्या रेती घाटावर ‘तांडव’ सुरू केल्याचे दिसून येते.
रेती लुटीचा हा गोरखधंदा मागील दोन ते तीन महिन्यांपासून बेधडकपणे सुरू असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, २०२१ च्या रेतीघात लिलावात गोंडपिपरीचे घाट नाही. तरीसुद्धा परवानाधारक असल्याच्या तोऱ्यात रेती उपसा सुरू असल्याची दिसून येत आहे. या प्रकारामुळे लगतच्या मूल मधील परवाना धारकांची डोकेदुखी वाढली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या सोबतच मृत्यूचा आकडा फुगत असल्याने प्रशासन कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी सरसावले आहे. आणि याच संधीचे सोने करण्याकरिता रेती तस्कर देखील सक्रिय झाले आहे. आज घडीला सर्वत्र रेती तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. आता या गोरखधंद्यात काही राजकीय रेती तस्करांनी ‘एन्ट्री’ केल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी थेट गोंडपिपरी रेती घाटावर मोर्चा वळवला आहे. सध्या गोंडपिपरी येतील घाटकूर, लिखितवाडा, येनबोडला, हिवरा, तारसा, राठपेट, धाबा रेतीघाट ‘मोकाट’आहे. आणि याच घाटावर लुटीचे ‘तांडव’ सुरू असल्याची चर्चा आहे.
बॉक्स
पावसाळा लक्षात घेता साठवणूक सुरू
काही दिवसानंतर पावसाळा सुरू होणार असल्याने रेतीचा साठा करण्यासाठी रेती तस्करांची धावपळ सुरू आहे. पावसाळ्यात रेतीचा तुटवडा भासत असल्याने दर आकाशाला भिडले असते आणि त्यातून गल्ला भरण्याची आयतीच संधी मिळते, हा या मागचा हेतू आहे.
बॉक्स
लिलावात समावेश का नाही?
विशेष म्हणजे, गोंडपिपरी येथील रेती घाटात बारीक व मुबलक प्रमाणात रेतीसाठा असताना सुध्दा लिलावात घाटाचा समावेश केला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घाटावर तस्करांचा धुमाकूळ सुरू असल्याने मूल तालुक्याच्या परवाना धारकांचा श्वास रोखल्या गेला आहे. फुकटची रेती कमी दरात मिळत असल्याने परवाना धारकांकडून आगाऊ दराने रेतीची उचल कोण करणार, या विवंचनेत त्यांची झोप उडाली आहे. उल्लेखनीय असे की मागील वर्षीच्या लिलावात मूल तालुक्यातील एक घाट होता. पण सन २०२१ च्या लिलावात तब्बल १२ रेती घाटाचा समावेश करण्यात आला आहे.