नागभीड : आरओ मशीनमधून पाणी काढण्यासाठी मशीनमध्ये शिक्का टाकत असतानाच युवतीला सर्पदंश झाल्याची घटना गुरुवारी सकाळी तालुक्यातील बनवाही येथे घडली. या युवतीला लागलीच येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गायत्री प्रभाकर कुंभरे (१७) असे या युवतीचे नाव असून, ती बनवाही येथे राहणारी आहे. बनवाही येथे थंड व शुद्ध पाण्यासाठी आरओ मशीन लावण्यात आली आहे. या मशीनवरून गावकरी पाणी घेत असतात. गुरुवारी सकाळी गायत्रीही या आरओ मशीनवर गेली. पाणी काढण्यासाठी मशीनमध्ये शिक्का टाकत असतानाच तिथे दबा धरून बसलेल्या सापाने गायत्रीच्या बोटाला दंश केला.
ही बाब गायत्रीच्या लक्षात आल्यानंतर तिने तिथे उपस्थित असलेल्या महिलांना सांगितली आणि तेथे एकच हलकल्लोळ निर्माण झाला. लोकांना माहीत असलेले प्राथमिक उपचार करण्यात आले. लगेच 'झेप' निसर्ग संस्थेच्या सहकार्याने गायत्रीला नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कामडी यांच्या सल्ल्यानुसार गायत्रीवर उपचार करण्यात आले. उपचारानंतर गायत्रीची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.