चंद्रपूर : काही वर्षांपूर्वी आयटीआयमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी स्पर्धा असायची. आता मात्र ते दिवस बदलले असून आयटीआयलाच विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. त्यातच मागीलवर्षी कोरोना संकटामुळे या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली होती. यावर्षीही अशीच अवस्था आहे. आयटीआय करूनही नोकरीची हमी नसल्यामुळे इतर अभ्यासक्रमांसारखीच आयटीआयचीही अवस्था होत असल्याचे बघायला मिळत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात ५२ शासकीय तसेच खासगी आयटीआय आहेत. यामध्ये १८ शासकीय तसेच ३४ खासगी आयटीआयचा समावेश आहे. यामध्ये ३ हजार ५४४ शासकीय, तर २ हजार ७३४ खासगी आयटीआयमध्ये जागा उपलब्ध आहेत.
चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा असल्यामुळे आयटीआय केल्यास रोजगार मिळेल, अशी विद्यार्थ्यांना आशा आहे. मात्र विद्यार्थी अधिक आणि रोजगार कमी, अशी अवस्था बनल्याने आयटीआय करूनही बेरोजगार राहण्याची वेळ अनेकांवर येत आहे. विशेष म्हणजे, खासगीच्या तुलनेमध्ये शासकीय आयटीआयमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षक, शिक्षक, प्रात्यक्षिक आदींद्वारे विद्यार्थ्यांना शिकविले जाते. असे असले तरी विद्यार्थी आता अन्य अभ्यासक्रमांकडे वळत असल्याचे विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जांवरून दिसून येत आहे.
बाॅक्स
जिल्ह्यात आयटीआय - ५२
शासकीय १८
खासगी - ३४
--
प्रवेश क्षमता
शासकीय जागा ३५४४
खासगी जागा २७२४
--
अर्ज स्थिती...
एकूण जागा ६२६८
आलेले अर्ज ६४३०
बाॅक्स
गतवर्षीपेक्षा कमी प्रतिसाद
मागील वर्षीपासून कोरोना संकट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयटीआयमध्ये प्रवेश घेणे टाळले आहे. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी अधिक अर्ज आले आहेत. मात्र आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये घटत आहे.
बाॅक्स
...म्हणून घटत आहेत विद्यार्थी
दहावी, बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी आयटीआयकडे वळतात. काही वर्षांपूर्वी आयटीआय केल्यानंतर नोकरीच्या संधी उपलब्ध होत होत्या. यामध्ये मोठी स्पर्धा नव्हती. आता मात्र आयटीआय करूनही जागाच निघत नसल्याने, शिकून उपयोग काय, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. विशेष म्हणजे, आयटीआय करून स्वरोजगार उभा करता येतो. मात्र भांडवलासाठीही विविध कागदपत्रे तसेच येणाऱ्या अडचणींमुळे विद्यार्थी या अभ्यासक्रमाकड़े आता दुर्लक्ष करीत आहेत.
बाॅक्स
विद्यार्थी म्हणतात...
कोट
पूर्वी आयटीआयचे शिक्षण घेतल्याबरोबर नोकरीच्या संधी प्राप्त होत होत्या. त्यामुळे आयटीआयला विशेष महत्त्व होते. आता दिवस बदलले. आयटीआय करूनही नोकरीची कुठेच संधी नाही. त्यामुळे या शिक्षणाकडे वळण्यापेक्षा इतर शिक्षण घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल आहे.
- मंगल डाखोरे, चंद्रपूर
कोट
आयटीआय करून कुठेतरी नोकरी मिळेल, ही आशा पूर्वी असायची. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आयटीआयमध्ये प्रवेश घेणारे केवळ आशेवर आहेत. विशेषत: वेकोलिमध्ये जमीन गेलेले बहुतांश विद्यार्थीच आयटीआय करीत आहेत. त्यांना वेकोलि नोकरी देईल, ही हमी आहे. उर्वरित बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी आयटीआय करीत आहेत.
- रोहन मुसले, चंद्रपूर