घनश्याम नवघडे नागभीडनागभीड पंचायत समितीमधील सात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असल्या आणि त्यांना ३१ मेपर्यंत भारमुक्त करण्यात यावे, असे निर्देश असले तरी हे अधिकारी आणि कर्मचारी येथेच कार्यरत आहेत. मग या प्रशासकीय बदल्यांना अर्थ काय, असा सवाल या ठिकाणी विचारला जात आहे.ज्यांच्या बदल्या नियमाकूल आहेत, अशांची जिल्हा परिषद पातळीवर यादी बनविण्यात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत अशा कर्मचाऱ्यांचा ‘दरबार’ भरतो आणि या दरबारातच नव्या ठिकाणी रूजू होण्याचे निर्देश दिले जातात. यावर्षी ही प्रक्रिया मे महिण्यात राबविण्यात आली आणि या अधिकारी कर्मचाऱ्यांना ३१ मेपर्यंत भारमुक्त करण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.विश्वसनीय माहितीनुसार यावर्षी नागभीड पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या सात अधिकारी कर्मचाऱ्यांना या बदली प्रक्रियेस सामोरे जावे लागले व त्यांचे नव्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेशसुद्धा देण्यात आल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, येथील कक्ष अधिकारी विशाल एस. यादव यांचे चंद्रपूर येथे स्थानांतरण झाले आहे. अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळत असलेले सुशील सी. बांबोडे यांची बदली ब्रह्मपुरी येथे झाली आहे. विस्तार अधिकारी यशवंत बी. लांडगे यांना चिमूर देण्यात आले आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ऋषभ के. बावणकर यांना पोंभूर्णा येथे पाठविण्यात आले आहे. कनिष्ठ सहाय्यक अमोल एम. चल्लावार यांनाही पोंभूर्णा देण्यात आले आहे तर संजीव ए. चांदेकर आणि राजेश एन. भाजीपाले यांची बदली चिमूर येथे करण्यात आली आहे.या अधिकारी कर्मचाऱ्यांना ३१ मेपर्यंत भारमुक्त करण्याचे निर्देश असले तरी यातील बहुतांश अधिकारी-कर्मचारी अद्यापही भारमुक्त झाले नाही. उलट यातील काही आपली बदली कशी रद्द होईल या खटपटीत असल्याची माहिती आहे. विश्वसनीय सुत्राने सांगितले की यातील एक अधिकारी नव्यानेच अस्तित्वात आलेल्या नागभीड नगर परिषदेत डेप्युटेशन मागत असून यासाठी त्याने चांगलीच फिल्डींग लावली आहे.स्थानांतरणाच्या प्रक्रियेला आता जवळपास दोन महिन्याचा कालावधी होत आहे. तरी हे अधिकारी-कर्मचारी भारमुक्त झाले नाही. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी संवर्ग विकास अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते.
मग या प्रशासकीय बदल्यांना अर्थ तो काय ?
By admin | Published: June 17, 2016 1:08 AM