चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराची एसीबीकडून चौकशी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर या विषयावरून एका व्हाट्स अप गृपवर पदाधिकाऱ्याची नावे टाकणे व त्या पोस्टला शेअर केल्या प्रकरणी शिवसेनेत महाभारत सुरू झाले आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश भिवगडे व माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक संदीप आवारी यांनी याप्रकरणी एकमेकांविरूद्ध पोलिसांत तक्रार नोंदविली असून आपली बदनामी केली जात असल्याचे म्हटले आहे. सतीश भिवगडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तर संदिप आवारी यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. हा प्रकार एवढ्यावरच थांबलेला नाही, तर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यापुढेही ही तक्रार मांडली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चंद्रपूर शहरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चंंद्रपूर मनपातील भ्रष्टाचाराची एसीबीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अन्य पदाधिकाऱ्यांसोबत माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक संदिप आवारी यांची चौकशी सुरू असल्याची पोस्ट व्हॉट्स अप सोशल मिडीयावर टाकण्यात आली. ही पोस्ट शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश भिवगडे यांच्याकडून शेअर झाली. यानंतर नगरसेवक संदिप आवारी यांनी सतीश भिवगडे यांच्यासंबधात काही दिवसानपूर्वी शहरात लावण्यात आलेल्या पोस्टरसंदर्भातील एक पोस्ट केली. त्यामुळे प्रकरण चांगलेच वाढले. आवारी यांच्याविरुद्ध भिवगडे यांनी केलेल्या तक्रारीत, आवारी यांनी ‘शिवसेना जिल्हा चंद्रपूर’, फेसबुक आणि ‘शिवसेना जिल्हा चंद्रपूर’ व्हॉट्स अप ग्रुपवर आपली बदनामी करणाऱ्या पोस्टरचे छायाचित्र टाकल्यान त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. तर, नगरसेवक संदिप आवारी यांनीसुद्धा रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीत शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश भिवगडे यांनी ‘शिवसेना जिल्हा चंद्रपूर’ आणि ‘सुवर्णकाळ शिवसेनेचा’ या व्हॉट्स अप ग्रुपवर आपल्याला बदनाम करणारी पोस्ट टाकली आहे. त्यामुळे सतीश भिवगडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, असे म्हटले आहे. दोन वरीष्ठ पदाधिकाऱ्यांमधील या वादामुळे शिवसेनेत वादळ उठले आहे. मनपाली एसीबी चौकशीसोबतच या वादाचीही चंद्रपुरात चर्चा रंगत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)भ्रष्टाचाराच्या चौकशीसंबधी एक पोस्ट होती, त्या पोस्टला आपण फारवर्ड केले. मात्र त्यानंतर माझी बदनामी करणारी पोस्ट टाकण्यात आली. मुंबई शिवसेना कार्यालयात फोन करून प्रकरणाची चुकीची माहिती देत आपणास धमकी देण्यात आली. - सतीश भिवगडे, चंद्रपूर जिल्हा प्रमुख, शिवसेना.पक्षाच्या नगरसेवकाची बदनामी करणारी पोस्ट फारवर्ड करणे हे पक्षाच्या जिल्हा प्रमुखाला शोभा देत नाही. मनपातील भ्रष्टाचाराची एसीबी मार्फत चौकशी सुरू आहे, त्यात आपला काही संबध नाही. सुरूवात भिवगडे यांनी केली, त्यामुळे हा सर्व प्रकार घडला. पक्षाच्या वरिष्ठांना याप्रकरणी माहिती दिली आहे. घडलेल्या प्रकरणाचीच माहिती दिली असून चुकीची माहिती किंवा धमकी दिली नाही. - संदीप आवारी, माजी उपमहापौर, मनपा, चंद्रपूर.
सोशल मीडियावरून शिवसेना पदाधिकाऱ्यांत महाभारत
By admin | Published: June 17, 2016 12:51 AM