चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या आणि जिल्ह्याच्या प्लास्टिकमुक्तीचा ध्यास घेतलेल्या चंद्रपुरातील सामाजिक संघटनांनी वर्षभर उपक्रम राबविण्यासाठी कंबर कसली आहे. याच उपक्रमातील पहिले पाऊल म्हणून काल १५ जूनला स्थानिक आयएमए सभागृहात पर्यावरण दिन पार पडला. त्यात लोकसहभागावर भर देवून महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाच्यावतीने या कामी पुढाकार घेण्याची तयारी उपस्थित लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी दर्शविली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर होते. उद्घाटन पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते झाले. आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. अनंत हर्षवर्धन, मनपा आयुक्त राजेश मोहीते मुख्य पाहुणे होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून केझ नगरपालिकेचे (जि. बिड) मुख्याधिकारी रामदास कोकरे होते. प्लॅस्टिकमुक्त दापोली शहराचे जनक अशी ओळख असलेल्या रामदास कोकरे यांनी पॉवर पार्इंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दापोली शहरात राबविलेल्या प्लॅस्टीकमुक्तीच्या मोहीमेतील यश सांगितले. प्लॅस्टिक निर्मूलन मोहीमेत नागरिकांची जनजागृती, त्यांना प्लॅस्टिकला पर्याय उपलब्ध करुन देणे आणि लोकसहभाग व कायदेशीर सक्ती हे तीन महत्वाचे टप्पे या कामी आल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणात पर्यावरणमंत्री संजय देवतळे म्हणाले, पर्यावरणाशी विविध विभागांचा संबंध आहे. भविष्यात त्या दृष्टीने उपाययोजना कराव्या लागणार आहेत. मुंबईतील भरतीदरम्यान समुद्राचे पाणी शहरात घुसल्याचे उदाहरणही त्यांनी यासाठी दिले. आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कायदे करून परिस्थिती पालटत नाही. लोकसहभाग व लोकचळवळीशिवाय प्रश्न सुटत नाहीत. राज्यात ३५० पेक्षा अधिक कायदे याच स्थितील अडकले आहेत. एखादी चळवळ व्यक्तीची न राहता समाजाची होते, तेव्हाच ती यशस्वी ठरते. जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकर म्हणाले, प्लॅस्टिक निर्मूलनावर एक वेगळी कार्यशाळा व्हावी. त्यातून जनतेचा सहभाग वाढावा, यासाठी आपण प्रयत्न करू. लोकचळवळीतून या कामी यश मिळेल, त्यासाठी प्रशासन सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रारंभी दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमादरम्यान, नगरसदेवक संजय वैद्य यांच्या ‘पर्यावरणाचा शत्रू : घनकचरा’ या विषयावरील पुस्तकाचे आणि जेसीसच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भीत्तीपत्रकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक डॉ. अनंत हर्षवर्धन यांनी केले. संचालन डॉ. मंगेश गुलवाडे तर आभार प्रा. योगेश दुधपचारे यांनी मानले. प्लॅस्टीक पिशव्या टाळा असा संदेश देत कार्यक्रमाअखेर सर्वांना कापडी पिशव्या भेट देण्यात आल्या. . (जिल्हा प्रतिनिधी)
चंद्रपूरच्या प्लास्टिकमुक्तीसाठी सामाजिक संघटना सरसावल्या
By admin | Published: June 16, 2014 11:24 PM