नागभीड : तालुक्यात शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा घटक असलेल्या अनेक सेवा सहकारी व आदिवासी सोसायट्या गटसचिवांअभावी अपंग झाल्या आहेत. शासनाच्या सहकार विभागाने या सोसायट्यांकडे लक्ष घातले नाही, तर यातील काही सोसायट्या भविष्यात इतिहासजमा होतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
नागभीड तालुक्यात यापूर्वी आदिवासी विविध कार्यकारी आणि सेवा सहकारी सोसायट्यांची संख्या ४६ होती. नंतर तालुक्यातील काही सोसायट्यांचे एकीकरण करण्यात आले. एकीकरणानंतर ३१ सोसायट्या आहेत. सद्यस्थितीत विविध कार्यकारी आदिवासी सोसायट्या ११ आणि २० सेवा सहकारी सोसायट्या तालुक्यात कार्यरत आहेत. तालुक्यात ३१ सोसायट्या असल्या, तरी या सोसायट्यांचा कारभार पाहणारे केवळ आठ गटसचिव कार्यरत आहेत. यात पाच कंत्राटी गटसचिवांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून गटसचिवांच्या नियुक्त्याच बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एखाद्या संस्थेला जर आपली सोसायटी चालवायची असेल, तर त्या संस्थेनेच आपल्या पातळीवर गटसचिवांची नियुक्ती करावी व आपल्या सोसायटीचा कारभार चालवावा, असे संबंधितांकडून काही वर्षांपूर्वीच निर्देश देण्यात आले होते. हे निर्देश मिळाल्यानंतर तालुक्यातील १० सोयायट्यांनी आपला कारभार चालविण्यासाठी गटसचिवांची नियुक्ती केली असल्याची माहिती आहे.
विविध कार्यकारी आदिवासी आणि सेवा सहकारी सोसायट्या शेतकऱ्यांच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. कर्जवितरणाचे अतिशय जटिल काम या गटसचिवांना करावे लागते. या कर्जवितरणाच्या फाईल जतन करून ठेवण्याची अतिशय मोठी जबाबदारी या गटसचिवांवर आहे. याशिवाय सोसायटीच्या दृष्टीने अनेक कामे या गटसचिवांना करावी लागतात. मात्र फार पूर्वीपासूनच या गटसचिवांना ना न्याय मिळाला आणि कामानुरूप मोबदला.
बॉक्स
एका गटसचिवांकडे चार सोसायट्यांचा कारभार
ज्या सोसायटीची गटसचिव नियुक्ती करून कारभार चालविण्याची क्षमता आहे, त्या संस्थांनी गटसचिव नियुक्त करून आपल्या सोसायटीचा कारभार सुरू ठेवला. मात्र या तालुक्यात आर्थिकदृष्ट्या अनेक सोसायट्या कमकुवत आहेत, या सोसायट्या स्वतंत्र गटसचिव नियुक्त करू शकत नाहीत, अशा सोसायट्यांचा प्रभार नियमित तीन आणि कंत्राटी पद्धतीने घेण्यात आलेल्या पाच अशा आठ गटसचिवांकडे देण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे नियमित आणि कंत्राट पद्धतीवर घेतलेल्या गटसचिवांकडे तीन-तीन, चार-चार सोसायट्यांचा प्रभार सोपविण्यात आला असल्याचीही माहिती आहे.