चंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाने मोठ्या संख्येने आश्रम शाळा सुरु केल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस या शाळांतील समस्या वाढत आहे. केवळ कागदोपत्री योजना सुरु असून विद्यार्थ्यांचे मात्र यात मोठे नुकसान होत आहे.शाळांमध्ये मुबलक, शुद्ध पाणी मिळावे तसेच विजेची समस्या लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाने जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांना सौर पाणीपुरवठा योजना सुरू केली. मात्र, सुरू होण्यापूर्वीच ही योजना कुचकामी ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.शासकीय आश्रमशाळांचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत अनेक योजना राबविण्यात आल्या. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे योजना कुचकामी ठरत आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात जात आहे.यामध्ये सौरदिवे, शिवकालीन पाणी बचाव योजना, गरम पाणी हिटर, सौरकूकर तसेच सौर पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विविध योजना शासन राबवितात. पाणीसमस्या लक्षात घेऊन काही शाळांमध्ये पाण्याच्या टाक्या पुरविण्यात आल्या. मात्र नळयोजना अपयशी ठरल्याने शेकडो शाळांतील टाक्या भंगाराम जमा आहेत. त्यानंतर प्रशासनाच्या मदतीने नळयोजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, तीसुद्धा योजना अपयशी ठरली. त्यामुळे आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना पाणीटंचाईचा सामना कारवा लागत आहे. अनेक शाळांमध्ये पाण्याच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना नदी-नाल्यांवर अंघोळीसाठी जावे लागते. नळयोजनेवर खर्च झाल्यानंतरही कित्येक शाळांमध्ये विहीर तसेच हातपंपावरच विद्यार्थ्यांना जावे लागते. ही समस्या लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाने काही शाळांमध्ये सौर पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. शासकीय आश्रमशाळांमध्ये लाखो रुपये खर्च करून सौर प्लेट लावण्यात आल्या. परंतु, मोटरपंप कमी पॉवरचा वापरल्याने पाण्याच्या टाकीत पाणीच चढत नसल्याने ही योजनादेखील कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे.कित्येक शाळांतील सौर प्लेटची नामधूस करण्यात आली असून, पाण्याच्या टाक्या शोभेची वस्तू ठरल्या आहेत. आश्रमशाळांत पुरेशे पाणी मिळत नसल्याने शौचालयाचा वापर न करता विद्यार्थी जंगलात जातात. यामुळे विचित्र घटनाही घडल्या असून, मुलांच्या सुरक्षेबाबतही चिंता निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)
आश्रमशाळेतील सौर योजना ठरली दिवास्वप्न
By admin | Published: June 25, 2014 11:42 PM