शिवसेनेची मागणी : चिखल, दुर्गंधीने अंगणवाडीतील मुले त्रस्तचिमूर : लहान मुलांना शिक्षण व संस्कारांचे वळण लावण्यासाठी शहरातील विविध प्रभागात अंगणवाड्या कार्यरत आहेत. मात्र, अनेक अंगगणवाड्यांना समस्यांनी ग्रासल्याचे दिसते. येथील अंगणवाडी क्र. २ मध्ये चिखल व दुर्गंधी पसरली असून मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात तक्रार करुनही संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे.चिमूर शहरात मोठ्या प्रमाणात अंगणवाड्या आहेत. मात्र, अनेक अंगणवाड्या या समस्याग्रस्त आहेत. अंगणवाडी क्र. चार ही अपना सभागृहामागील परिसरासाठी आहे. मात्र, येथे जागा असूनही बांधकाम अपूर्ण आहे. अंगणवाडी क्र. सहा ही संत भय्यू महाराज विद्यालयामागील परिसरासाठी आहे. परंतु हिचेही बांधकाम झाले नाही. अंगणवाडी क्र. चार व सहा या अंगणवाडी क्र. दोन मध्ये सध्या भरत आहेत.एकाच अंगणवाडीत तीन अंगणवाड्या कार्यरत असल्याने याचा फटका लहान मुले व पालकांना बसत आहे. अंगणवाडी क्र. दोन ही आदर्श कॉलनीतील असून, मुख्य रस्त्याला लागून आहे. परंतु अंगणवाडीसमोर अतिक्रमीत दुकाने आहेत. त्यामुळे जाण्या-येण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.अंणवाडीसमोरील बाभळीच्या झाडांवरील पक्षांच्या शौचाची घाण पसरलेली असते. पावसामुळे आवारात चिखल झाला आहे. चिखलातून मुलांना व पालकांना जावे लागते. सुरक्षा भिंत नसल्याने लहान मुले असुरक्षित आहेत. शासनाने अंगणवाड्यांना रेडीओ दिले, परंतु वीज पुरवठा नाही. येथील समस्याबद्दल अंगणवाडी सेविकांनी नगर परिषद व बालविकास प्रकल्प कार्यालय यांना वारंवार सूचना दिल्या. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. नगर परिषद व बालविकास प्रकल्प कार्यालयाने अंगणवाडीच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख धरमसिंह वर्मा, उपजिल्हाप्रमुख अनिल डगवार, मनोज तिजारे, केवलसिंह जुनी, विजय गोठे, रवी तिवाडे, प्रविण ढवळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
अंगणवाड्यांच्या समस्या तत्काळ सोडवा
By admin | Published: September 19, 2016 12:52 AM