चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील मंगी येथील समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रशासनाला दिले. मंगी येथे विशेष ग्रामसभा घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले. या ग्रामसभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी सोहेल शर्मा, उपवनसंरक्षक हिरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामभेट कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी मंगी गावास भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या विविध समस्या व अडचणी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्या.मंगी येथील पाणी पुरवठ्यासाठी बांधण्यात येणाऱ्या पाण्याचे टाकीचे काम बंद आहे. शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम प्राप्त झाली नाही. या परिसरातील ग्रामस्थांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बससेवा सुरू करण्यात यावी, मंगी-भेंडवी मार्गावरील पूल खचलेला असल्याने पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, मंगी-रांजीगुंडा मार्गावरील नाल्यावर रपटे बांधण्यात यावेत, मंगी-पांचगाव मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे, अपुरा पाऊस झाल्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, ज्या कुटूंबाकडे शिधापत्रिका नाही त्यांना नवीन शिधापत्रिका देण्यात याव्यात, रांजीगुंडा येथे नवीन बोअरवेल, वाढीव विद्युत पोल आणि वाढीव गावठान मंजूर करावे, आदिवासी बचत गटांना विट भट्ट्यांचे प्रस्ताव मंजूर करावे, प्रलंबित उपसा जलसिंचन योजनेचे काम पूर्ण करून जलसिंचन योजना सुरू करावी व शासकीय जमिनीवर अतिक्रम केलेल्या शेतकऱ्यांना पट्टे देण्यात यावे आदी मागण्या नागरिकांनी ग्रामसभेत केल्या.या समस्या व अडचणी प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. आपल्या समस्या वेळेत सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. या व्यतिरिक्तही काही अडचणी किंवा समस्या असल्यास आपल्याशी संपर्क साधावा असे त्यांनी नागरिकांना सांगितले. काही वैयक्तीक कारणास्तव जिल्हाधिकारी यांनी मंगी येथे मुक्काम करू शकले नाही. येत्या आठवड्यात जिल्हाधिकारी मुक्काम करणार आहेत असे सुत्रांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: गावातील समस्यांची दखल घेतल्यामुळे नागरिकांना दिललासा मिळाला असून येत्या काही दिवसात समस्या सुटतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. (नगर प्रतिनिधी)
मंगीवासीयांच्या समस्या प्राधान्याने सोडवा
By admin | Published: July 16, 2014 12:06 AM