बँकसाठी नवी इमारती उभारावी
चंद्रपूर : दुर्गापूर येथील अलाहाबाद बँकेत दरवर्षी खातेधारकांची संख्या वाढतच आहे. मात्र, जुन्या इमारतीतील अपुऱ्या जागेमुळे खातेदारांना त्रास सहन करावा लागत आहे. बदलत्या गरजा लक्षात घेऊन बँक व्यवस्थापनाने प्रशस्त जागेसाठी नव्या इमारतीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.
हिमायतनगर ते बुद्धगुडा रस्त्याची दुरवस्था
जिवती : तालुक्यातील बुद्धगुडा हे गाव अनेक समस्येने ग्रासले आहे. या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली. त्यामुळे गावातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हिमायतनगर ते बुद्धगुडा रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कचरापेट्यांची संख्या वाढवावी
चिमूर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. चौकातील कचरापेट्याही तुंबल्या आहेत. स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नगर परिषदतर्फे शहरात विविध ठिकाणी कचराकुंडी बसविण्यात आल्या. परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात या कचराकुंडीमध्ये कचरा टाकतात. मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पेट्यांची नियमित स्वच्छता होत नाही.
तुकूम परिसरातील नाल्यांची स्वच्छता करा
चंद्रपूर : तुकूम परिसरातील विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाॅर्डातील नाल्यांचा उपसा होत नसल्यामुळे तुडुंब भरल्या आहेत. डासांचे प्रमाण वाढून आजार होऊ शकतात. त्यामुळे मनपाने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली.
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरावीत
नागभीड : पशुधन विकासाला चालना देण्यासाठी अनेक योजना आहेत. मात्र, पदे रिक्त असल्याने विकासाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पंचायत समिती स्तरावर सुधारित आकृतिबंधानुसार अनेक पदांना मंजुरी मिळाली आहे. पण, पदे भरण्यात आली नाहीत. योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी वर्ग ३ च्या पशुधन पर्यवेक्षकांची नियुक्तीची गरज आहे.
प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करावी
गोंडपिपरी : तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले व धाबा येथून ३ किमी. अंतरावरील धाबा ते पोेडसा प्रमुख मार्गावर असलेल्या हिवरा बसस्थानकाची दुर्दशा झाली आहे. प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन दुरुस्तीची मागणी आहे.
अनुकंपाधारकाची रिक्त पदे भरावीत
चंद्रपूर : आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत त्यांच्या शिक्षण पात्रतेनुसार नोेकरीवर घेतल्या जाते. परंतु अनेक पदे भरण्यात आली नाहीत. चंद्रपूर तहसील कार्यालयातही पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.