चंद्रपूर : जिल्ह्यात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या सोडविण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी वैद्यकीय संघटनेमार्फत पंचायत राज समितीचे सदस्य तथा आमदार डॉ. देवराव होळी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. आपण विधानसभेत या समस्या मांडून समस्या सोडवू, असे आश्वासन आमदार होळी यांनी शिष्टमंडळाला दिले.
आदिवासी व दुर्गम नक्षलग्रस्त भागात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देतात. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना अगाऊ वेतनवाढ, ३ टक्के राखीव कोट्यातून वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पाल्यांना व कर्मचाऱ्यांना लाभ द्यावा, शंभर टक्के वैद्यकीय कॅशलेस सेवा द्यावी, ५० टक्के इनसर्ह्विस पीजी कोटा सुरू करण्याबाबत डीएसीपी योजना लागू करावी, ३५ टक्के व्यवसायरोध भत्ता, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे लागू करावा, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना वाहन उपलब्ध करून द्यावे आदी मागण्यांचे निवेदन आमदार देवराव होळी यांना दिले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, संघटनेचे अध्यक्ष डॉ. अमित जयस्वाल, सचिव डॉ. संजय आसुटकर, राज्य मॅग्मो सहसचिव डॉ. संदीप गेडाम, कोषाध्यक्ष डॉ. प्रतीक बोरकर, जिल्हा समन्वयक डॉ. आशिष आसुटकर, डॉ. दिनेश चाकोले उपस्थित होते.