बाबासाहेब वासाडे : उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना दिले निवेदन
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे सर्वच शिक्षणसंस्थांचे मोठे हाल होत आहेत. संस्था चालविणे तसेच संस्थेसाठी घेतलेले कर्ज भरणेही कठीण झाले आहे. एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न आहे. त्यामुळे राज्य शासनाने विनाअनुदानित संस्थांच्या समस्या सोडवून दिलासा द्यावा, अशी मागणी बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीचे अध्यक्ष, कृषी जीवन विकास प्रतिष्ठान येनबोडीचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब वासाडे यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना दिले आहे.
कोरोना संकटामुळे मागील वर्षी तसेच यावर्षी लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी विनाअनुदानित असलेल्या संस्थांना चालविणे कठीण झाले आहे. विनाअनुदानित संस्था शिष्यवृत्तीच्या स्वरूपात शासनातर्फे प्राप्त होणाऱ्या अनुदानावरच अवलंबून राहाते; परंतु शासनाने अनुदान प्राप्त होईपर्यंत इतर सर्व आर्थिक कामे पूर्ण करण्याकरिता बॅंकेकडून कर्ज घेतले आहे. सध्याच्या कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण, परीक्षा ऑनलाइनच्या माध्यमातून होत आहेत. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. त्यातच शैक्षणिक सत्र २०२०-२१ची शिष्यवृत्ती आजतागायत विद्यार्थ्यांना मिळाली नसल्याने विद्यार्थीही हतबल झाले आहेत. त्यामुळे महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासही सक्ती करता येत नाही. परिणामी महाविद्यालयाला कोणताही आर्थिक आधार नसल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
सर्वच विनाअनुदानित शिक्षणसंस्थांच्या समस्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवाव्या, अशी विनंतीही त्यांनी निवेदनातून केली आहे.