लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पाणीपुरवठा व नवीन वीज जोडणीचा प्रश्न जीवन प्राधिकरण, मनपा व महावितरणने निकाली काढावा, अशी सूचना विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय विश्रामगृहातील आढावा बैठकीत दिले. वैद्यकीय महाविद्यालयाला बोअरवेल, मनपा, मजिप्राद्वारे पाणीपुरवठा होऊ शकतो. सध्या चार बोअरवेल परिसरात उपलब्ध आहेत. ज्यामुळे बांधकामाची प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर ०.९ एमएलडी पाण्याची गरज राहणार आहे. त्यापैकी ०.३ एमएलडी पाणी प्रक्रिया करून वापरण्यायोग्य करणार आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त पाणी ०.६ एमएलडी लागणार आहे, अशी माहिती जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जीवन प्राधिकरण विभागाने या आधी वैद्यकीय महाविद्यालयाला पत्र लिहून या सर्व सर्वेक्षणासाठी पाच लाख देण्याबाबत विनंती केली. वैद्यकीय महाविद्यालयाने याबाबत दखल घेण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी केल्या. यावेळी जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर राखी कंचर्लावार, डॉ. मंगेश गुलवाडे, अधिष्ठाता डॉ. नितनवरे, आयुक्त राजेश मोहीते आदी उपस्थिती होते.
पहिल्या टप्प्यासाठी ६० लाख- महाविद्यालयाच्या नवीन विद्युत कनेक्शनसंदर्भात २२.९४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महावितरण कंपनीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला या आधीच दिले आहे, परंतु हे कनेक्शन दोन सोर्समधून हवे असल्याने पहिल्या टप्प्यासाठी ९.३ कोटी रु. मंजूर करावे, असेही बैठकीत ठरले. त्याचप्रमाणे बे- कंस्ट्रक्शनसाठी पहिल्या टप्प्यासाठी ६० लाख रुपये याचबरोबर देण्यात यावे असे ठरले.