चंद्रपूर : सासऱ्याचे निधन झाल्याने काही दिवसांसाठी सासरी मुक्कामी असणाऱ्या जावयानेच सासूचे दागिने चोरल्याची घटना भद्रावती तालुक्यातील माजरी येथे बुधवारी (दि. १४) उघडकीस आली. सासूच्या तक्रारीवरून पोलिसांनी जावयाला दागिन्यांसह अटक केली. विशाल शुक्राचार्य वनकर (३५) रा. माजरी असे आरोपीचे नाव आहे.
माजरी येथील वॉर्ड क्र. ४ आंबेडकर वॉर्डात विधीशा सुखराज रामटेके (६१) कुटुंबासह राहतात. त्यांच्या पतीचे २६ मे २०२३ रोजी निधन झाले. तेव्हापासून जावई विशाल शुक्राचार्य वनकर हा सासरीच मुक्कामी राहतो. दरम्यान, घरातून ३८० ग्रॅम चांदी व दोन ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार सासू विधीशा रामटेके यांनी माजरी पोलिसात केली. त्यावरून ठाणेदार अजित सिंग देवरे यांनी तक्रारीची नोंद घेत बुधवारी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यावेळी काही बाबी संशयास्पद आढळल्या.
दागिन्यांची चोरी कुणी बाहेरच्या नव्हे; तर घरच्या सदस्यांकडूनच झाल्याचा संशय ठाणेदार देवरे यांना आला. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांची कसून चौकशी केली. पोलिसी हिसका दाखविल्यानंतर जावई विशाल वनकर याने दागिने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी विशाल वनकर याला अटक करून त्याच्याकडून ३८० ग्रॅम चांदी व दोन ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. पोलिसांनी हे दागिने सासू विधीशा रामटेके यांच्याकडे सुपुर्द केले. या प्रकरणाचा तपास ठाणेदार अजित सिंग देवरे यांच्या मार्गदर्शनात हवालदार प्रदीप पाटील, हरिदास चोपणे, सूरज आवताडे करीत आहेत.