दिलीप मेश्राम
नवरगाव : घरातील आर्थिक परिस्थिती बिकट. आईवडील मजुरीचे काम करीत कुटुंबाचा गाडा हाकतात. मात्र, परिस्थिती कशीही असो, मला डाॅक्टर व्हायचे आहे आणि रुग्णांची सेवा करायची आहे. हा एकच ध्यास ठेवून पंकजने अनेक अडचणीचा सामना करून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. आता डाॅक्टर बनून तो कोरोनाच्या परिस्थितीत रुग्णांच्या सेवेत रुजू झाला आहे.
सिंदेवाही तालुक्यातील नाचनभट्टी या केवळ १२०० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या खेडेगावातील डाॅ. पंकज प्रकाश बन्सोड याची ही कथा. आईवडील १२ पर्यंत शिकलेले. परंतु, पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करणारे. आपण कमी शिकलो, त्यामुळे आपल्यावर मोलमजुरी करण्याची वेळ आली. मात्र, आपल्या मुलाच्या वाट्याला असे दिवस येऊ नयेत, ही अपेक्षा बाळगून असणाऱ्या आणि तितक्याच जिद्दीने प्रतिसाद देणाऱ्या पंकजने गावातून पहिला डाॅक्टर होण्याचा मान मिळवला. त्याने सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा नाचनभट्टी, १० वी पर्यंतचे शिक्षण भारत विद्यालय नवरगाव तर १२ वीपर्यंतचे शिक्षण श्री ज्ञानेश महाविद्यालय, नवरगाव येथे घेतले. यानंतर आपल्याला डाॅक्टर व्हायचे आहे, यासाठी नीटची तयारी केली. आणि यातून पंकजने चांगले गुण मिळविले. शासकीय कोट्यातून एमबीबीएससाठी शासकीय हाॅस्पिटल ॲन्ड मेडिकल काॅलेज, नागपूर येथे नंबर लागला. मागील चार- पाच वर्षांच्या शैक्षणिक कालावधीत अनेक आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. इकडून-तिकडून, नातेवाईकांकडून, शेवटी नाहीच झेपल्याने शैक्षणिक कर्जही घेतले. परंतु, शिक्षण पूर्ण केले. नुकताच शेवटच्या वर्षाचा निकाल लागला आणि तो पास होऊन वयाच्या २३ व्या वर्षी डॉक्टर झाला.
डॉक्टर झाला तेव्हा काेरोना संसर्ग सुरू झाला होता. याच कोरोनाकाळात आता तो रुग्णांची सेवा करीत आहे. इतर विद्यार्थ्यांसाठी तो परिसरात आदर्श बनला आहे. सतत त्याच्याकडून रुग्णांची सेवा अखंडितपणे सुरू राहो, हीच अपेक्षा.