लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : थकीत पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी मागील २३५ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या डेरा आंदोलनातील कामगारांना न्याय मिळाला आहे. थकीत पगार न्यायालयात जमा करण्याचे तसेच कामगारांना कामावर रुजू करून घेण्याचे औद्योगिक न्यायालयाने आदेश दिले आहे. यामुळे कामगारांनी पेढे वाटून, ढोलताशावर नाचत गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कंत्राटी कामगारांचे १६ महिन्यापासून ७ महिन्याचे वेतन थकीत आहे. त्यामुळे फेब्रुवारी २०२१ पासून कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेरा आंदोलन सुरू केले होते. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने कामगारांचे थकीत पगार देण्याऐवजी त्यांच्या जागेवर नवीन कंत्राटी कामगारांची भरती केली.या विरोधात वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत दर्शना झाडे, सविता दुधे, माधुरी खोब्रागडे व निशा हनुमंते या कामगारांनी चंद्रपूरच्या औद्योगिक न्यायालयामध्ये स्थगिती आदेश मिळवण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयामध्ये जवळपास तीन महिन्यापासून या अर्जावर नियमित सुनावणी सुरू होती. अखेर ३० सप्टेंबर रोजी न्यायालयाने या प्रकरणांमध्ये स्थगिती दिली. थकीत वेतन एक महिन्याच्या आत न्यायालयात जमा करावे व कामगारांना कामावर घेण्याचा आदेेश न्यायालयाने दिला.