विनायक येसेकर
भद्रावती : भद्रावती- नागपूर - आंध्रप्रदेशाकडे मालवाहू ट्रक जात असताना भद्रावती मुख्य मार्गावर चालकाच्या मोबाईलमध्ये बिघाड आला. मोबाईलमध्ये पेटीएम, नेट बँकिंग इत्यादी आर्थिक व्यवहाराच्या व प्रवासात लागणाऱ्या इतर सुविधा असल्याने ट्रकमध्ये लागणारे इंधन तसेच इतर खर्च कसा होणार, या चिंतेने चालकाला मालवाहू ट्रकचा पुढील प्रवास भद्रावतीतच थांबवावा लागला. हा प्रकार रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडला.
रामचंद्रपूर या गावाहून आंध्रप्रदेशकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा चालक करीम मुल्ला याच्या ट्रकचे इंधन कमी झाले होते. तसेच त्याला आपल्या जेवणाची सुद्धा व्यवस्था करायची होती. त्यासाठी तो आपल्या मोबाईलमधून आर्थिक व्यवहार करीत होता. त्यातच त्याच्या मोबाईलमध्ये बिघाड आला. मोबाईल काम करीत नव्हता. त्या मोबाईलमध्ये पेटीएम, नेट बँकिंग सारखी सुविधा उपलब्ध होती. तो त्याचा पुरेपूर वापर करीत होता. परंतु आता मोबाईलमध्येच बिघाड आल्याने आपला पुढील प्रवास कसा होणार, आपल्याजवळ पुरेसे पैसे नाही, माल वेळेत पोहोचणार की नाही, या चिंतेने तो ट्रकचालक अस्वस्थ झाला होता. अशातच या चालकाने सामाजिक कार्यकर्ते अतुल कोल्हे हे दुचाकीने जात असताना थांबविले. त्यांना आपबिती सांगितली. मात्र बाजारपेठ सायंकाळी ५ वाजताच बंद झाल्याने कोल्हे हेही हतबल झाले. अखेर कोल्हे यांनी त्या चालकाला स्वतःच्या दुचाकीवर बसवून मोबाईल रिपेरिंग करणाऱ्या गोलू गोहने यांच्या घरी नेले. तिथे मोबाईल रिपेअर झाला आणि लॉकडाऊन झालेला मालवाहू ट्रकचा पुढील प्रवास सुरू झाला.
===Photopath===
140621\img-20210612-wa0002.jpg
===Caption===
मोबाइल बंद होताच मालवाहू ट्रक चालकाचा प्रवास थांबला.