चंद्रपूर : रस्ते गाव-शहरांना जोडतात, त्यात प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि जलद व्हावा यासाठी नवनवीन रस्ते महामार्ग तयार करण्यात येतात. मात्र, राज्यातील अनेक महामार्गांची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाल्याचे चित्र आहे. राजुरा - कोरपना - आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ बी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख नीतेश महागोकर यांनी केली आहे.
या मार्गावरून दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलगणा, उत्तरेकडील उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पूर्वेकडील छत्तीसगढ, ओरिसा, पश्चिम बंगाल आदी राज्यातून लांब पल्ल्याची मोठ्या प्रमाणात जडवाहतूक होते. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. रस्त्याच्या बाजूच्या कडाही दबल्या गेल्या आहे. परिणामी वाहनधारकांना सांभाळूनच आपले वाहन चालवावे लागते आहे. रात्रीच्या वेळेस तर ही स्थिती अधिकच गंभीर बनते आहे.
राजुरा तालुक्यातील रामपूर ते कापनगाव, कोरपना तालुक्यातील खिर्डी ते वनसडी, माथा फाटा ते कोरपना, कोरपना ते अकोला फाटा, पारडी ते राज्य सीमा आदी मार्गादरम्यान स्थिती अतिशय बिकट बनली आहे. हे खड्डे म्हणजे अपघाताला आमंत्रणच असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे असून याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. या मार्गावरील पंधरा दिवसांत खड्डे न बुजवल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा महागोकर यांनी दिला आहे.