रत्नाकर चटप
नांदाफाटा : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. काही दिवस आधीच सोयाबीनचे भाव नऊ हजारांपर्यंत गेले होते. त्यानंतर दोन दिवस आधीच सहा ते सात हजार रुपयांपर्यंत सोयाबीन खरेदी केले गेले. आता आणखी सोयाबीनचे भाव घसरले असून, आता ४००० ते ४५०० रुपयात शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री करावी लागत आहे.
यातच संततधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतात सोयाबीनची कापणी करून उभी असलेली दिसत आहे. पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन खराब होण्याच्या स्थितीत आहे. प्रत नसलेल्या सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात किंमत मिळत नसल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णता बिघडलेले आहे. नऊ हजारांपर्यंत गेलेले सोयाबीन चार हजार रुपयात विक्री करावी लागत असल्याने बी - बियाणे कीटकनाशकांचा खर्चही निघेल की नाही, अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात आता निर्माण झाली आहे. कोरपना तालुक्यातही यावर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. बियाणांचे भाव वाढले. परंतु विक्री करताना मात्र कवडीमोल भावात विक्री करावी लागत आहे. दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांचा माल बाजारात विक्रीसाठी गेला की किमती घसरतात, अशी स्थिती आहे.