लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सोयाबीन पिकावर २७२ प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो, असे कृषितज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या सोयाबीनला चांगला दर आहे. वातावरणामुळे कपाशीची स्थिती बरी असली तरी अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर मिलीबग (पिठ्या ढेकूण) रोगाने आक्रमण केले आहे. रोग नष्ट झाला नाही तर उत्पादन घटण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.सोयाबीनवर पडणाऱ्या किडींचे पुढील सहा गटांमध्ये वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये बियाणे व रोपे खाणाऱ्या किडी, खोड पोखरणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या किडी, रस शोषणाऱ्या किडी, फुले व शेंगा खाणाऱ्या किडी आणि साठवलेल्या बियाण्यातील किडींचा समावेश होतो. यापैकी सोयाबीनवर मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या व नुकसानकारक असणाऱ्या खोडमाशी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, पाने पोखरणारी अळी, चक्री भुंगे, उंट अळी, केसाळ अळी, हुमणी तसेच तुडतुडे, फुलकिडे व पांढरी माशी इत्यादी किडींची प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीनला शेंगा लागण्याची स्थिती असतानाच मिलीबग (पिठ्या ढेकूण) रोग वाढू लागला. रोग नियंत्रणासाठी कृषी विभाग जागृती करीत आहे.
नियंत्रणाचे उपायजैविक कीडनाशकाचा वापर करताना व्हर्टिसिलियम लेकॅनी ४० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जेथे किडीचा प्रादुर्भाव आहे तेथेच याची फवारणी करण्याचा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला.
काय आहे मिलीबग ?मिलीबग कीड कपाशीचे खोड, पानाच्या देठाजवळ पुंजक्यात राहते. ही कीड झाडातील रस शोषण करते. कीड चिकट द्राव सोडते, त्यामुळे पाने काळपट होतात. जास्त प्रादुर्भाव झाला तर पाने व फांद्या वाळून जातात.
मिलीबग रोखण्यासाठी ही घ्या काळजी रासायनिक कीडनाशकांचा वापर करताना क्लोरपायरिफॉस (२० टक्के) ३० मि.लि. किंवा बुप्रोफ्रेझीन २० मि.लि. प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी प्रादुर्भावित पाने, झाडाचे खोड तसेच जमिनीवरदेखील करावी.
पेरणीवर लावलेला पैसा निघतो की नाही ?
माझी शेती बल्लारपूर तालुक्यात आहे. सोयाबीन पेरणीपासूनच यंदा हवामान व पाऊस पोषक आहे. मात्र, काही दिवसांपासून किडीचा प्रादुर्भाव सुरू झाला. काही दिवसांपूर्वीच फवारणी केली आहे. फवारणीचा फायदा झाला नाही तर लागवडीचा खर्च तरी निघण्याची शक्यता कमीच आहे. -रामचंद्र येरणे, शेतकरी भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर
कपाशीची स्थिती चांगली आहे. परंतु सोयाबीन पिकावर मिलीबगने आक्रमण केले. झाडाला शेंगा लागत आहेत. त्यातच हा रोग आल्याने चिंता वाढली. कृषी विभागाच्या पथकाने शेतीची पाहणी करून प्रतिबंधात्मक फवारणीची माहिती दिली. त्यानुसार फवारणी सुरू केली आहे. माझ्या शेतीजवळचे अन्य शेतकरीही फवारणी करीत आहेत.- गंगाधर मालधुरे, शेतकरी, बल्लारपूर