अजिंक्य वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: ताडोबातील वन्यजीवांच्या संरक्षणाकरिता नेमण्यात आलेल्या विशेष व्याघ्र संरक्षण दलाकडून जंगलात नाममात्र गस्त होत आहे. या दलाकडून गस्तीच्या नावाखाली केवळ वाहनातून फेरफटका मारला जात असल्याची माहिती आहे. ताडोबातील कोेअर झोनमध्येच झालेल्या वाघिणीच्या शिकारीमुळे या दलाचे पितळ उघडे पडले आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ताडोबा, मोहुर्ली, कोळसा अशा तीन वनपरिक्षेत्राचा समावेश आहे. याचे क्षेत्र एकूण १७२ चौ.किमी. एवढे आहे. यापैकी ६२५ चौ. किमीला कोअर झोनचा दर्जा आहे. या सभोवताल उर्वरित ११०१ चौ.किमी. बफर झोनचे क्षेत्र आहे. जंगलाचा व्याप बघता कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने २०१२-२०१३ मध्ये येथे विशेष व्याघ्र संरक्षण दलाला (एसटीपीएफ) पाचारण करण्यात आले. तीन वनपरिक्षेत्राकरिता स्वतंत्र तीन पथक आहेत. ताडोबाच्या गस्तीकरिता ३२, मोहुर्लीकरिता ३६ तर कोळसा वनपरिक्षेत्राकरिता ३७ जवान (वनरक्षक व वननिरीक्षक) आहेत. प्रत्येक पथकाकरिता एक-एक महिला वनपरिक्षेत्र अधिकारी आहे. असे एसटीपीएफचे एकूण १०५ जवान कार्यरत आहेत. त्यात ४१ महिलांचाही समावेश आहे. येथील एसटीपीएफची सुरक्षा ही केवळ देखाव्याकरिता आहे की गस्तीकरिता हा एक मोठा प्रश्न वाघिणीच्या शिकारीनंतर पुढे येत आहे. विशेष व्याघ्र सुरक्षा दल ताडोबात गस्ती घालण्यात कमी पडत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.उल्लेखनीय म्हणजे ताडोबात गस्त घालणाऱ्या पथकाचे मुख्यालय चिमूर, मोहुर्लीत व कोळसामध्ये गस्त घालणाऱ्या पथकाचे मुख्यालय चंद्रपूर व मूल येथे मुख्यालय आहे. मुख्यालय कार्यस्थळी नसल्याने असामाजिक घटकांना जंगलात शिरकाव करण्याची संधी मिळत आहे.कोअर झोनमध्ये अनेक प्राण्यांची शिकारताडोबातील कोअर झोनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वन्यजीवाच्या शिकारी होत होत्या. त्यांना तिथेच कापल्या जात होते. वन्यप्राण्याला कापण्याकरिता बराच कालावधी लागतो. रात्र असेल तर त्यांना प्रकाशाची गरज असते. सर्वत्र त्याचा आवाज ऐकू येतो. असे असतानाही या दलाला याची माहिती नव्हती वा कधी दिसून आले नाही, याबाबत संताप व्यक्त होत आहे. जंगलातच कापलेल्या वन्यप्राण्यांचे अवयव लपवून ठेवल्या जात होते, हेही आता वाघिण शिकार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या बयाणावरून स्पष्ट होत आहे. अनेक प्रकारचे तारांचे फासे जंगलातच लपवून असायचे. सदर गैरप्रकार केव्हाच एसटीपीएफच्या निदर्शनास का आले नाही, असा प्रश्न आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलाने नियमाप्रमाणे गस्त घातली असती तर वाघिणीची शिकार झालीच नसती, असेही आता बोलले जात आहे.
ताडोबातील विशेष व्याघ्र संरक्षण दल कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:47 AM
ताडोबातील वन्यजीवांच्या संरक्षणाकरिता नेमण्यात आलेल्या विशेष व्याघ्र संरक्षण दलाकडून जंगलात नाममात्र गस्त होत आहे.
ठळक मुद्देकोअर झोनमध्ये नाममात्र गस्त