बँक एजन्टना कोरोनाचा फटका
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. याचा फटका बँक एजन्टनाही बसला आहे. त्यामुळे अनेकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत आहे.
रस्त्याचे काम करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील काही अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. मात्र कोरोनानंतर लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर या रस्त्याचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे रखडलेले बांधकाम सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
जिल्हा परिषदेतील गर्दीवर नियंत्रण
चंद्रपूर : मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. एरव्ही गजबजलेल्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या कर्मचाऱ्यांशिवाय कुणीही येत नसल्याचे चित्र आहे.
रिक्षाचालकांना आर्थिक त्रास
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या संख्येने रिक्षाचालक आहेत. यामाध्यमातून ते आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय बंद झाला आहे. काही मोजक्याच रिक्षाचालकांना रोजगार मिळत आहे. परिणामी दिवस कसे काढावेत, हा प्रश्न सध्या त्यांना सतावत आहे.
गावातील गर्दीवर आले नियंत्रण
चंद्रपूर : लॉकडाऊननंतर जमावबंदी लागू करण्यात आल्याने गावाच्या पहारावर तसेच चौका-चौकात नागरिकांच्या चर्चेवर प्रतिबंध आला आहे. त्यामुळे इतरवेळी सायंकाळी तसेच सकाळी चर्चा करण्यासाठी येणारे नागरिक आता आपल्या घरात राहणे पसंत करीत आहेत.
अवकाळी पावसाचा अनेकांना फटका
चंद्रपूर : दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या सर्वांचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
शीतपेय विक्रेते अडचणीत
चंद्रपूर : उन्हाळ्यामध्ये शीतपेये आईस्क्रिम आदींची मोठी मागणी असते. मात्र कोरोनामुळे सर्व व्यवसाय बंद असल्याने थंडपेय विक्रेते अडचणीत सापडले आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४० अंश सेल्सिअस असते. त्यामुळे उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी शीतपेयांची मागणी उन्हाळ्यात वाढते. ही बाब हेरुन शहरात आईस्क्रिम, कुल्फी, उसाचा रस आदी विक्रीची मोठी दुकाने थाटतात. तसेच अनेकजण हातगाड्यांवरही विक्री करतात. मात्र ऐन उन्हाळ्याचा सिझन लागताच कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे थंडपेय विक्रीचा व्यवसाय करणारे अडचणीत सापडले आहेत.
जड वाहनांना बंदी घालण्याची मागणी
चंद्रपूर : येथील बिनबागेटमार्गे रामनगर चौकात जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या संख्येने जड वाहने जातात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्यावरील ज़ड वाहतूक बंद करावी, तसेच रामनगर तसेच बिनबागेट परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बंगाली कॅम्प परिसरातील समस्या सोडवा
चंद्रपूर : बंगाली कॅम्प परिसरातील श्यामनगर, इंदिरानगर परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, नाल्यांचा प्रश्न पाहिजे त्या प्रमाणात अजूनही निकाली न निघाल्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचून राहत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिसराचा विकास करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
उड्डाण पुलांची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : लोकसंख्येच्या तुलनेत चंद्रपूर शहरातील रस्ते अपुरे पडत असल्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये उड्डाण पुलांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र उड्डाणपुलांच्या देखभाल दुरुस्तीकडे पाहिजे तसे लक्ष दिले जात नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. बाबूपेठ परिसरातील तसेच चंद्रपूर बसस्थानक परिसरात असलेल्या पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या पुलाची देखभालदुरुस्ती करून वाहनधारकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.