चंद्रपूर : मागील वर्षी झालेल्या नैसर्गिक नुकसानीवर मात करत जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा नव्या हंगामासाठी जोमाने कामाला लागला आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात सोयाबीन व तुरीचे पीक अपेक्षित प्रमाणात झाले नाही. तसेच कापसाच्या पिकातही मोठी घट झाल्याने हा तोटा दूर करण्यासाठी सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकर्यांनी गव्हाची पेरणी केली. मात्र अकाली पावसाने यावेळीही नुकसान केले.सध्या लग्नाचे मुहूर्त मोठय़ा प्रमाणात असल्याने शेतीकामासाठी योग्य सवड मिळणार नसल्याने आताच पेरणीपूर्व कामांना सुरूवात केली आहे. अशातच अवकाळी पाऊस आल्याने शेतकर्यांनी नांगरणी, वखरणीच्या कामाला सुरूवात केली आहे. पावसाळा लागण्यासाठी अजून अवधी असला तरी, शेती यावर्षी लवकरच रिकामी झाली आहे. त्यामुळे शेत मशागतीच्या कामांना वेग आला आहे. काळ बदलत चालला आहे. काळानुरूप शेती करण्याच्या पद्धतीतसुद्धा बदल होत आहे. मजुरीचे चढलेले दर, चार्याची वाढती टंचाई लक्षात घेता बैलद्वारे मशागत करण्यापेक्षा ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्यावर शेतकर्यांचा भर आहे. ट्रॅक्टरद्वारे कामाचा निपटारा लवकर पूर्ण होतो. आताच्या काळात बैलजोड्याही नावापुरत्याच उरल्या आहेत. वर्षभराचा खर्च, लग्नसमारंभ, आजारपण यावर होणार्या खर्चापेक्षा उत्पन्न कमी होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. मात्र, यंदा तरी चांगले पीक होईल. या आशेने शेतकरी कामाला लागला आहे. गतवर्षीच्या अतवृष्टी, महापूर व अवकाळी पावसाच्या संकटात सापडलेला, बी-बियाणे, खते आदीसाठी पैशाची व्यवस्था कशी होईल, या विवंचनेत बळीराजा असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)
पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग
By admin | Published: May 12, 2014 11:31 PM