चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांना पोषण आहार शिजविण्यासाठी पुरवठा करण्यात आलेले मसाले पावडर मुदतबाह्य आहे. असा आहाराचा पुरवठा करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्यानी स्थायी समितीच्या सभेत अध्यक्षांच्या दिशेन मसाले पावडर भिरकावले, त्यामुळे सभेत चांगलेच वादळ उठले. गुरूवारी जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा झाली. जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम यांनी शाळांना पुरवठा करण्यात आलेले मुदतबाह्य मसाले पावडर सभागृहात आणले. मुदतबाह्य मसाले पावडर व निकृष्ठ दर्जाचा पोषण आहार शाळांना पुरवठा होत असून हेच आहार विद्यार्थ्यांना दिले जात असल्याने त्यांच्या आरोग्याचा धोका निर्माण होत असल्याचा मुद्दा सभागृहात लावून धरला. मात्र त्यांचे सभाध्यक्षांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने संतप्त होऊन अध्यक्षांच्या दिशेने मसाले पावडर भिरकावले. काँग्रेसचे गटनेते सतीश वारजूकर यांनी मजूर संस्थाना देण्यात येणारे कामे रोस्टरविनाच दिली जात असल्याचा मुद्दा लावून धरला. जिल्हा परिषदेला शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. मात्र अनेक विभागांचा निधी योग्य नियोजनाअभावी अखर्चित आहे. पाणी टंचाई आरखड्यासाठी आलेल्या निधीपैकी सव्वा कोटीचा निधी अखर्चित असून अनुसुचित जाती व नवबौध्द घटक वस्ती विकास योजनेच्या कामासाठी सन २०१५-१६ मध्ये ८ कोटी ७५ लाखांचा निधी मिळाला. मात्र प्रस्तावच न आल्याने ५ कोटीचा निधी येथेही अखर्चित असून कृषी विभागाचेही २ कोटी रूपये खर्चाअभावी परत जाण्याच्या मार्गावर असल्याचा मुद्दा सतीश वारजूकर, विनोद अहीरकर यांनी लावून धरला. या मुद्यावरही सभेत चर्चा घडून आली. (स्थानिक प्रतिनिधी)४जिल्हा परिषदेत गेल्या कित्येक महिन्यांपासून गाजत असलेल्या बैलबंडी घोटाळ्याच्या चौकशीवर गुरूवारच्या सभेत कोणताही निकाल लागू शकला नाही. मागच्या सभेत आठ दिवसांची मुद्दत मागून चौकशी पूर्ण करण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र आजच्या सभेतही घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल अप्राप्त असल्याचे कारण देत आणखी सहा दिवसाची मुदत मागत चौकशी पूर्ण करण्याचे आश्वासन विरोधकांना दिले. त्यामुळे हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला आहे. पोंभुर्णाच्या बीडीओंची होणार चौकशी४स्वच्छ भारत अभियानाच्या जनजागृती व प्रसारासाठी प्रत्येक पंचायत समित्यांना दोन लाखांचा निधी जिल्हा परिषदेने वितरीत केला. या निधीतून पत्रके छापून .जनजागृती करायची होती. मात्र पोंभुर्णा पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी पत्रके छापताना शुभेच्छूक म्हणून देवाडा येथील सरपंच विलास मोगरकर यांचे नाव टाकले. पैसा जिल्हा परिषदेचा आणि शुभेच्छूक सरपंच कसे काय, हा मुद्दा विरोधी सदस्यांनी लावून धरल्याने बीडीओंच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.मजूर संस्थांच्या नावावर मलिंदा ४मजूर संस्थांना रोस्टरनुसार कामे देणे आवश्यक असताना अनेक संस्थांना रोस्टरविनाच कामे दिली जात आहेत. त्यामुळे काही अनेक मजूर संस्थांना काम मिळत नाही. मजूर संस्थांच्या नावावर अधिकारी व सत्ताधारी मलिंदा खात असल्याचा आरोप काँगेसचे गटनेते सतीश वारजूकर यांनी केला आहे.पोषण आहारात डिर्टजंट पावडर टाकल्याप्रकरणी करंजी येथील मुख्याध्यापकाच्या निलंबनाचे आदेश दिले आहे. मुदतबाह्य मसाले पावडर व आहार पुरवठा प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे.- संध्याताई गुरूनुले, अध्यक्ष, जिल्हा परिषद चंद्रपूर
अध्यक्षांवर भिरकावले मसाले पावडर
By admin | Published: February 19, 2016 1:23 AM