गेवरा : सावली तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या करोली-आकापूर या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागत आहे. विशेष म्हणजे, या गावांत अद्यापही एसटी पोहचली नाही. वन्यप्राण्यांच्या दहशतीत असलेल्या या परिसरातून पायदळवारी करताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत जावे लागत आहे. गावात एसटी सुरु करण्याची मागणी असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.सावली तालुका मुख्यालयापासून ४७ ते ५० कि.मी. अंतरावरील शेवटच्या टोकावर असलेल्या करोली, आकापूर येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्ग १ ते ४ पर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. त्यानंतरच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथे जावे लागते. या गावात एसटी पोहचली नसल्याने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागते. मागील अनेक दिवसापासून ग्रामस्थ तथा तंटामुक्तसमितीच्या सदस्यांनी आगार प्रमुखांकडे गावात एसटी सुरु करण्याची मागणी केली. एवढेच नाही तर, अनेकवेळा निवेदनही देण्यात आले. मात्र कोणताही उपयोग झाला नाही.ब्रह्मपुरी-मुडझा-व्याहाड या मार्गाने धावणाऱ्या बस पैकी सकाळी शालेय वेळात व्याहाड-गेवरा,करोली- आक्सापूर-मुडझा पुढील प्रवास, तसेच मुडझापर्यंत ब्रह्मपुरी मार्गावरून आलेल्या बस मुडझा आक्सापूर करोली-गेवरा बु. पुढील प्रवास अशी सायंकाळी व सकाळी बस सुरु केल्यास विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही फायदा होऊ शकतो. (वार्ताहर)
प्राथमिक शिक्षणासाठी चिमुकल्यांची पायपीट
By admin | Published: January 20, 2015 12:03 AM