सास्ती : राजुरा तालुक्यातील कढोली (बु.) प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला सुरुवात होताच ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. दररोज जवळपास शंभरहून अधिक नागरिकांना लस दिली जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. त्याअंतर्गत राजुरा तालुक्यातील कढोली (बु.) या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नागरिकांची धवपळ सुरू आहे. कढोली (बु.), बाबापूर, मानोली, पोवनी, साखरी, गोवरी, धिडशी, पेल्लोरा, साखरी, वरोडा, रामनगर, धोपटाळा रामनगरसह परिसरातील इतर गावातील जवळपास १ हजार २३७ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. दररोज शंभरहून अधिक नागरिक लसीकरणाचा लाभ घेत असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र, कढोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विपीन कुमार यांनी दिली. कोरोनावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लस घेण्याचे आवाहन केले आहे.