जेसीबीसह दोन ट्रॅक्टर जप्त : चंद्रपूर महसूल विभागाची कारवाई
चंद्रपूर : जिल्ह्यात रेतीघाटांचा अद्यापही लिलाव झाला नाही. त्यामुळे रेती तस्कर प्रशासनाची नजर चुकवून मोठ्या प्रमाणात तस्करी करीत आहे. या तस्करांवर आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने पथकांची निर्मिती केली आहे. या माध्यमातून तस्करांच्या मुसक्या आवळल्या जात आहे. आरवट येथून पाच कि.मी. अंतरावर जेसीबीच्या सहाय्याने रेती खनन तसेच वाहतूक करताना शनिवारी रात्री महसूल विभागाच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत एका जेसीबीसह दोन ट्रॅक्टर जप्त केले. या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यात अद्यापही रेतीघाटांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे चोरवाटेने रेती तस्कर रेतीची चोरी करून ती गरजूंना अव्वाच्यासव्वा भावाने विकत आहे. यामध्ये शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. दरम्यान, या तस्करांवर आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने विविध पथकांची निर्मिती केली आहे. या पथकांद्वारे धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, या पथकाची नजर चुकवून आरवट येथून पाच कि.मी अंतरावर असलेल्या रेतीघाटावर रात्रीच्या सुमारास रेती तस्करी करीत होते. यासंदर्भात माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रोहन घुगे यांच्या निर्देशानुसार तसेच तहसीलदार नीलेश गौंड यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार राजू धांडे, प्रकाश सुर्वे, प्रवीण वरभे, शैलेश दुवावार, विशाल कुरेवार, रवी तल्हार व तलाठी राहुल भोंगळे यांच्या पथकाने रविवारी पहाटे जंगलातून पायदळ जात घाटावर धडक दिली. यावेळी जेसीबी क्रमांक एमएच ३४ बीआर ५९७२ सह ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३४ बीएफ ५०९८, ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३४ एपी ५१८८ ला जप्त करण्यात आले. दरम्यान, जप्त करण्यात आलेले वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.