कोलंबो - निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेत आज भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरेल. त्यापूर्वीच भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चांदीमलला दोन सामन्यासाठी निलंबित केलं आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला श्रीलंकेकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशवर विजय मिळवला होता. पण शनिवारी मात्र श्रीलंकेला बांगलादेशविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती अत्यंत कमी राखल्याबद्दल आयसीसीनं दिनेश चांदीमलला दोन सामन्यासाठी निलंबित केलं आहे. त्यामुळं दिनेश चांदीमल निदाहास चषकात पुढील दोन सामने खेळू शकणार नाही. निर्धारित वेळेत श्रीलंकेच्या संघाने चार षटके कमी टाकल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. श्रीलंकेचा संघ आज 12 मार्चला भारताशी आणि 16 मार्चला बांगलादेशशी खेळणार आहे. परंतु या सामन्यांमध्ये चंडिमलला खेळता येणार नाही.
आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी चंडिमलवर कारवाई करताना निलंबन आणि दंडसुद्धा ठोठावला आहे. निर्धारित वेळेपेक्षा एक षटक उशीरा टाकल्यामुळं बांगलादेशचा कर्णधार महमदुल्लावर सामन्याच्या मानधनाच्या 20 टक्के आणि अन्य खेळाडूंना 10 टक्के दंड ठोठावला आहे.
आयसीसीच्या खेळाडूंच्या आचारसंहितेसंदर्भातील षटकांची गती कमी राखल्याबद्दलच्या कलम 2.5.2 चा भंग झाला असल्यामुळे सर्व खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातून 60 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. चंडिमलच्या खात्यावर दोन निलंबनाचे गुण जमा झाले. याचाच अर्थ एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय किंवा दोन ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये खेळण्यास त्याला बंदी असते.
काय आहे नियम - निर्धारित वेळेपेक्षा षटकांची गती कमी राखल्यास 2 निलंबनाचे गुण मिळतात. असे कोणी दोषी आढळल्यास एक कसोटी किंवा दोन वनडे किंवा दोन टी-20 साठी कर्णधाराला निलंबित केलं जात. त्याचप्रमाणे खेळाडूला 60 टक्केपर्यंतची रक्कम मानधनातून कपात केली जाते.
प्रतिस्पर्धी संघभारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), दीपक हुड्डा, वाश्ािंग्टन सुंदर, यजुवेंंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज आणि रिषभ पंत (विकेटकीपर).
श्रीलंका : सूरंगा लकमल (कर्णधार), उपुल थरंगा, धनुष्का गुणतिलक, कुसाल मेंडिस, दासुन शनाका, कुसाल जनिथ परेरा, तिसारा परेरा, जीवन मेंडिस, इसुरू उदाना, अकिला धनंजय, अमिला अपोंसो, नुआन प्रदीप, दुष्मंत चामीरा, धनंजय डि सिल्वा.